PM Modi Diwali 2021 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदाही देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जाऊ शकतात. पीएम मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेजवळ जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातील अनेक भागांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर, पंतप्रधानांच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचं ठिकाण शेवटच्या क्षणी बदललं जाऊ शकतं. दरम्यान, पंतप्रधान मोदी जेव्हा जेव्हा सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जातात, तेव्हा सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची भेट गुप्त ठेवली जाते.
पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमधील जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत, असे नाही. यापूर्वी 2019 मध्ये आर्टिकल 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमध्ये दिवाळी साजरी केली होती. यावेळी पंतप्रधान मोदींनी राजौरी जिल्ह्यात तैनात जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.
दरम्यान, पंतप्रधान मोदी दरवर्षी सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करतात. यावेळी पंतप्रधान जवानांसोबत वेळ घालवतात. तसेच त्यांचं मनोधैर्य उंचावण्याचं काम करतात. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडमध्येही जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे.
केंद्र सरकारकडून जनतेला 'दिवाळी गिफ्ट'; पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये घट
दिवाळीच्या शुभमुहुर्तावर काल (गुरुवारी) केंद्र सरकारकडून सामान्य लोकांना काहीसा दिलासा देणारा निर्णय घेतला गेला. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे पाच आणि दहा रुपयांची कपात करण्याचा काल निर्णय घेतला. राज्यांनीही त्यांच्या व्हॅट करात कपात करण्याचं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. याला प्रतिसाद देत तात्काळ गोव्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अतिरिक्त सात रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा निर्णय जाहीर केला. आता महाराष्ट्रात वॅट करात कधी कपात होणार? असा सवाल केला जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :