नवी दिल्ली : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कमी लसीकरण  (Covid Vaccine) झालेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेतली. कोरोना (Coronavirus) प्रतिबंधक लसीचा पहिला डोस 50% पेक्षा कमी दिलेल्या आणि  दुसऱ्या डोसची व्याप्ती अत्यंत कमी असलेल्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीला व्हर्चुअली उपस्थित होते. सोबतच झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय  या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. 


बैठकीनंतर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, लसीकरणाच्या मोहिमेला अजून वेग द्यायचा आहे. आता 'हर घर टीका, घर घर टीका' याअंतर्गत लसीकरण मोहिम चालवली जाईल. लसीकरणासाठी धर्मगुरुंची मदत घ्या. धर्मगुरुंचे लसीकरणासंबंधीचे व्हिडीओ व्हायरल करा तसेच एनएसएस, एनसीसीची मदत घ्या, असंही आवाहन मोदी यांनी केलं. बिरसा मुंडा जयंतीला आदिवासी बहुल भागात विशेष लसीकरण मोहिम चालवा असं आवाहनही त्यांनी केला. मोदी यांनी म्हटलं आहे की, 100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीनं देशासमोर अनेक आव्हानं उभी केली आहेत. आता आपापल्या जिल्ह्यात लसीकरण वाढवण्यासाठी इनोव्हेटीव्ह पद्धतीवर जास्त काम करावं लागेल, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.  


पहिल्या डोससह दुसऱ्या डोसवरही लक्ष केंद्रीत करा


पीएम मोदी यांनी म्हटलं की, प्रत्येक घरी जाऊन लस देत असताना पहिल्या डोससह दुसऱ्या डोसवर देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कोरोनाच्या केस कमी झाल्यावर आपण हलगर्जीपणा करतो. लस घेण्याची घाई करण्याची मानसिकता कमी होते. तसं न करता प्रत्येकानं लस घ्यावी, असंही मोदी म्हणाले.  


औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती 
औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीकरण वाढविण्यासाठी कुठली पाऊले प्राधान्याने उचलत आहोत याची माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन कवच कुंडल अभियान राबवून लसीकरण वळवले असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते. 


देशात 107 कोटींहून अधिक लसीचे डोस दिले
देशामध्ये मंगळवारपर्यंत कोविड-19 वरील लसीचे 107 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार मंगळवारी एका दिवसात 37,38,574 डोस देण्यात आले आहेत