मुंबई : दिवाळीच्या शुभमुहुर्तावर काल केंद्र सरकारकडून सामान्य लोकांना काहीसा दिलासा देणारा निर्णय घेतला गेला. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे पाच आणि दहा रुपयांची कपात करण्याचा काल निर्णय घेतला. राज्यांनीही त्यांच्या व्हॅट करात कपात करण्याचं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. याला प्रतिसाद देत तात्काळ गोव्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अतिरिक्त सात रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा निर्णय जाहीर केला. आता महाराष्ट्रात वॅट करात कधी कपात होणार? असा सवाल केला जात आहे.

  


केंद्राचा निर्णय आल्यानंतर भाजप शासित राज्यांपैकी गोव्याने व्हॅट कपात केली आहे. गोव्यासह उत्तरप्रदेश, मणिपूर, कर्नाटक, उत्तराखंड या राज्यांनीही अतिरिक्त व्हॅट कपात केली आहे. आता अन्य भाजपशासित राज्य काय निर्णय घेतात याकडेही लक्ष लागून आहे. दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या किमतीवरुन केंद्राच्या विरोधात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं. आता केंद्रानं कपातीचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी वॅट कपात कधी करणार  असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


गोव्यात पेट्रोल 12 रुपयाने आणि डिझेल 17 रुपयांनी स्वस्त


काल केंद्रानं निर्णय घेतल्यानंतर लगेच गोवा सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे गोव्यात आता पेट्रोल 12 रुपयाने आणि डिझेल 17 रुपयांनी स्वस्त झालं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करुन मोदींनी देशातील जनतेला दिवाळी भेट दिल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या संदेशात म्हटलं . त्यामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत गोवा सरकार पेट्रोलच्या दरात अतिरिक्त सात रुपये आणि डिझेलच्या दरात अतिरिक्त सात रुपये कपात करत असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केलं. 


 






केंद्र सरकारने प्रति लिटर पेट्रोलमागे 5 रुपये तर  प्रति लिटर डिझेलमागे 10 रुपये कमी केले आहेत. त्यामुळे सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती आता अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. पेट्रोल-डिझेलचे कमी झालेले दर हे आजपासून लागू असतील असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरच्या एक्साईज टॅक्समध्ये पाच रुपये तर डिझेसवरच्या एक्साईज टॅक्समध्ये 10 रुपये कमी केल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती उतरल्या आहेत. 


महत्वाच्या बातम्या :