वॉशिंग्टन: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची 'व्हाईट हाऊस'मध्ये भेट झाली. या भेटीनंतर मोदी-ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला. मोदी-ट्रम्प यांच्या चर्चेतील महत्त्वाच्या गोष्टींवर एक नजर -


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -

  1. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माझी आजची भेट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. परस्पर विश्वासांवर ही भेट आधारित होती. आमची प्राथमिकता, मूल्ये, चिंता आणि आवड समान असल्यामुळे ही भेट महत्वपूर्ण होती. भारत आणि अमेरिका यांच्यातील परस्पर सहकार्याची भावना या भेटीच्या केंद्रस्थानी होती.



  1. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांबाबत सविस्तर चर्चा झाली. दोन्ही देश परस्पर सहकार्याची नवी उंची गाठतील.



  1. भारतातील सामाजिक, आर्थिक बदलाच्या मुख्य प्रवाहात आम्ही अमेरिकेला प्रमुख भागीदार समजतो. आमच्या सहयोगामुळे माझं न्यू इंडियाचं व्हिजन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं 'मेक अमेरिका, ग्रेट अमेरिका' स्वप्न पूर्ण होण्यासाठी गती मिळेल.



  1. मजबूत आणि समृद्ध अमेरिकेमध्येच भारताचं हित जोपासलं आहे. तसंच भारताचा विकास आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताची भूमिका अमेरिकेच्याही फायद्याची आहे. उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक संबंधाचा विकास ही आमच्या सहकार्याची प्राथमिकता आहे. ते आणखी दृढ करण्यास आम्ही प्रयत्नशील राहू.



  1. आम्ही केवळ शक्यतांचे सहकारी नाही, तर आम्ही सध्याच्या आणि भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठीही एकत्र आलो आहोत. आजच्या बैठकीत आम्ही दहशतवाद आणि वाढत्या अतिरेकी कारवायांवर गंभीर चर्चा केली. दशतवादाचा मुकाबला आणि दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणं हे आमच्या भागीदारीचा एक महत्त्वाचा भाग असेल.


 

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

  1. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाच्या नेत्याचं व्हाईट हाऊसमध्ये स्वागत करणं सन्मानाची बाब आहे. मी नेहमीच म्हणत आलो आहे की तुमचा देश (भारत), तुमचे लोक, त्यांची संस्कृती, वारसा यांच्यावर माझी अगाध श्रद्धा आहे.



  1. यंदा भारत स्वातंत्र्याची 70 वर्षे पूर्ण करणार आहे. त्यानिमित्ताने अमेरिकेकडून मी तमाम भारतीयांना शुभेच्छा देतो. अमेरिका आणि भारत यांची मैत्री मूल्यांवर आधारित आहे. ज्यामध्ये लोकशाहीच्या कटिबद्धतेचा समावेश आहे.



  1. अनेकांना माहितही नाही की, अमेरिका आणि भारताचं संविधान तीन सुंदर शब्दांनी सुरु होतं. ते शब्द आहेत 'वी द पीपल' . पंतप्रधान मोदी आणि मी या शब्दांचं महत्त्व जाणतो.



  1. आजच्या भेटीनंतर मी सांगू इच्छितो की भारत आणि अमेरिकेतील संबंध यापूर्वीपेक्षा आणखी घनिष्ठ झाले आहेत. वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेला भारत आता सर्वात मोठी कर सुधारणा करत आहे. प्राथमिक प्रश्न सोडवण्यासाठी भारताची दूरदृष्टी उत्तम आहे.



  1. भारत आणि अमेरिका दोन्ही देश दहशतवाद आणि दहशतवादी विचारधारेविरुद्ध लढत आहेत. आम्ही कट्टर इस्लामी दहशतवाद नष्ट करु. आमचं सैन्य त्या दिशेने काम करत आहे. पुढील काही महिन्यात दोन्ही देशाचं सैन्य संयुक्त सराव करेल.