बंगळुरु : बंगळुरुत मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागपुरातील युवकाला नव्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे. आरक्षित जंगलात प्रवेश केल्याने ट्रेसपासिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर होस्मत रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
मूळ नागपूरचा असलेला मुदित दंडवते आयआयटी बॉम्बेचा माजी विद्यार्थी आहे. बंगळुरुत त्याने हेल्थकेअर इंडस्ट्रीत व्यवसाय सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वी बंगळुरुतील थट्टेकेरे तलावाजवळ मुदित मित्रासोबत ट्रेकला गेला होता. दोघांसोबत त्यांचे दोन कुत्रेही होते.
तलावाजवळ पोहचताच कुत्रे तलावात शिरले. तलावाजवळ मगरींपासून सावध राहण्याचा इशारा असलेली पाटी होती, मात्र दोघांचंही त्याकडे लक्ष गेलं नाही. कुत्र्यांपाठोपाठ मुदितही तलावातील पाण्यात शिरला, तर त्याचा मित्र तलावाबाहेरच थांबला.
दुर्दैवाने तलावातील मगरींनी मुदितवर हल्ला केला. मगरींनी मुदितच्या डाव्या हाताचा लचका तोडला. कशीबशी त्याने मगरींच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली. त्यानंतर मित्राने त्याला होस्मत रुग्णालयात दाखल केलं.
मुदित अद्याप धक्क्यातून सावरला नसतानाच पोलिसांनी त्याला अडचणीत टाकलं आहे. रामनगर जिल्ह्यातील थट्टेकेरी तलाव हा आरक्षित वनक्षेत्रात येतो. त्यामुळे कर्नाटक वन संरक्षण कायदा 1963 अंतर्गत कलम 24 अन्वये त्याच्यावर ट्रेसपासिंग म्हणजेच अतिक्रमण केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.