वॉशिंग्टन : अमेरिकेनं पाकिस्तानी दहशतवादी सय्यद सलाउद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. सय्यद सलाउद्दीन पाकिस्तानी दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या आहे. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प भेटीआधीच अमेरिकेनं ही घोषणा केली आहे. भारतीय परराष्ट्र खात्यानं या घोषणेला दुजोरा देत अमेरिकेच्या निर्णयाचं स्वागतच केलं आहे.
"अमेरिकेच्या या निर्णयामुळे हे स्पष्ट झालं आहे, की भारत आणि अमेरिका दहशतवादाविरोधात एकत्र लढत आहेत," असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागळे यांनी म्हटलं आहे.
काही वेळातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे, त्यामुऴे मोदी भेटीआधीच अमेरिकेनं घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र स्वागत केलं जात आहे.
कोण आहे सय्यद सलाउद्दीन?
सय्यद सलाउद्दीन हा पाकिस्तानी दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या आहे. भारताविरोधात नेहमीच गरळ ओकणाऱ्य़ा सलाउद्दीननं आपल्या संघटनेच्या माध्यमातून काश्मीरसह भारतात अनेकवेळा हल्ले केले आहेत.
एप्रिल 2014 मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यांची जबाबदारी हिजबुल मुजाहिद्दीननं घेतली होती.