Russia Ukraine Crisis : रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांकडून एकमेकांवर तुफान गोळीबार सुरू आहे. त्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती बिकट झाली आहे. तेथील धान्यसाठा संपत आला असल्याची माहिती मिळत आहे. शिवाय हजारो भारतीय युक्रेमध्ये अडकले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. 


रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आण्विक हल्ल्याचा इशारा दिला आहे. रशियाने युक्रेनवर आण्विक हल्ला केला तर त्याचे परिणाम जगभरातील देशांवरही होणार आहेत. त्यामुळेच रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठक घेण्याची शक्यता दोन दिवसांपूर्वी वर्तवण्यात येत होती. आज एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी या विषयावर लवकरच बैठक घेणार आहेत, या बैठकीत युक्रेनने भारताकडे मागितलेल्या मदतीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 






युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काल फोनरुन संवाद साधला होता. व्होदिमर झेलेन्स्की यांनी मोदींना संयुक्त राष्ट्र संघामध्ये पाठिंबा देण्याची विनंती केली होती. UNSC मधील मतदानात भारताच्या स्वतंत्र आणि संतुलित भूमिकेची व्होदिमर झेलेन्स्की यांनी प्रशंसा केली होती. यावेळी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधानांना युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या परिस्थितीबद्दल सर्व माहितीही देण्यात आली होती.   


व्होदिमर झेलेन्स्की आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत मोदींनी शांतता पुनर्स्थापनेच्या प्रयत्नांमध्ये कोणत्याही प्रकारे योगदान देण्याची भारताची वचनबद्धता व्यक्त केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) जारी केलेल्या निवेदनानुसार, मोदींनी तेथे सुरू असलेल्या संघर्षामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी युक्रेनच्या अधिकाऱ्यांना भारतीय नागरिकांच्या जलद आणि सुरक्षित बाहेर काढण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद साधून मदतीची मागणी केल्याची माहिती व्होदिमर झेलेन्स्की यांनी ट्विट करून दिली होती. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. रशियाचे एक लाखाहून अधिक हल्लेखोर आमच्या भूमीवर आहेत. हे हल्लेखोर नागरी वस्त्यांना लक्ष्य करत आहेत. सुरक्षा परिषदेत राजकीय पाठिंबा देण्याची विनंती त्यांच्याकडे केली आहे. आक्रमकांना एकत्र येऊन रोखूयात. ' असे ट्वीट व्होदिमर झेलेन्स्की यांनी केले होते. 


महत्वाच्या बातम्या