PM Modi: काही दिवसांवर आलेल्या G-20 परिषदेपूर्वी पंतप्रंधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) पीटीआय वृत्तसंस्थेला विशेष मुलाखत दिली आहे, यात त्यांनी देशातील अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होईल, भ्रष्टाचार आणि जातिवादाला देशात स्थान राहणार नाही, असा विश्वास मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. तसेच, G-20 परिषदेमुळे देशाला झालेल्या फायद्यांबद्दल देखील त्यांनी वक्तव्य केलं आहे.


"G-20 अध्यक्षपदामुळे अनेक सकारात्मक परिणाम"


भारताच्या G-20 अध्यक्षपदामुळे अनेक सकारात्मक परिणाम झाले आहेत आणि यापैकी काही माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. जगाचा जीडीपी-केंद्रीत दृष्टिकोन आता मानव-केंद्रीत दृष्टिकोनात बदलत आहे आणि यामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. तर 'सबका साथ, सबका विकास' हे जगाच्या कल्याणासाठी मार्गदर्शक तत्त्व ठरू शकतं, असंही मोदींनी यावेळी म्हटलं आहे.


"देशातून भ्रष्टाचार आणि जातिवाद नष्ट होईल"


2047 पर्यंत भारताचा सर्वांगीन विकास होईल, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. भारतात भ्रष्टाचार आणि जातीवादाला स्थान नसेल, असंही ते म्हणाले. तर, जगाने G-20 मध्ये आमचे शब्द आणि दृष्टिकोन केवळ कल्पना म्हणून नाही तर भविष्यासाठी एक रोडमॅप म्हणून पाहिल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं. पुढे मोदी म्हणाले, फार पूर्वीपासून भारताकडे शंभर कोटी भुकेल्या पोटांचा देश म्हणून पाहिलं जात होतं, पण आता भारत हा शंभर कोटी महत्त्वाकांक्षी मनांचा आणि दोन अब्ज कुशल हातांचा देश बनला आहे.


"भविष्यात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल"


भारतीयांना विकासाचा पाया घालण्याची आज मोठी संधी आहे, जी पुढील हजार वर्षे स्मरणात राहील, असं मोदी म्हणाले. सध्याचा भारताचा विकास पाहता भविष्यात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.


"सायबर धमक्या गांभीर्यानं घेतल्या पाहिजे"


सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठी जागतिक सहकार्याची गरज असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. गुन्हेगारी हेतूंसाठी आयसीटीचा वापर रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं. पुढे ते म्हणाले, सायबर धमक्या गांभीर्याने घेतल्या पाहिजे. सायबर दहशतवाद, मनी लाँड्रिंग ही फक्त ऑनलाईन धोक्याची झलक आहे. बेकायदेशीर आर्थिक कारवाया आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सायबर क्षेत्राने एक नवा पाया रचल्याचंही मोदी म्हणाले. दहशतवादी त्यांचे नापाक मनसुबे पार पाडण्यासाठी ‘डार्कनेट’, ‘मेटाव्हर्स’ आणि ‘क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म’ वापरत आहेत आणि राष्ट्रांच्या सामाजिक जडणघडणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा उल्लेखही पंतप्रधान मोदींनी केला.


'खोट्या बातम्यांमुळे अराजकता निर्माण होऊ शकते'


खोट्या बातम्यांमुळे पसरत असलेल्या अराजकतेवरही पंतप्रधान मोदींनी वक्तव्य केलं आहे. खोट्या बातम्यांमुळे अराजकता निर्माण होऊ शकते आणि वृत्त माध्यमांची विश्वासार्हता खराब होऊ शकते, असं मोदी म्हणाले. तर खोट्या बातम्या पसरवून त्याचा उपयोग समाजात अशांतता निर्माण करण्यासाठी होऊ शकतो, असंही ते म्हणाले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Asia Cup 2023: क्रिकेटमध्ये फ्लॉप पण हॉकीत हिट, पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या टीम इंडियाचे मोदींकडून अभिनंदन