PM Narendra Modi : भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सवा’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक गावात 75 झाडे लावण्यात यावीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या  विजयानंतर पंतप्रधान मोदी यांचा गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज भव्य रोड शो झाला. त्यानंतर पंतप्रधानांनी गुजरात पंचायत महासंमेलनाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशातील प्रत्येक गावात 75 झाडे लावण्यात यावीत असे आवाहन केले. 






पंतप्रधान मोदी म्हणाले, "अहमदाबाद ही महात्मा गांधी यांची आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमी आहे. महात्मा गांधी यांनी नेहमीच ग्रामीण विकास, स्वावलंबी गाव आणि सशक्त गाव याविषयी सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजप सरकार वचनबद्ध आहे. महात्मा गांधी यांचे ग्राम स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंचायत राज्य व्यवस्था खूप महत्वाची आहे. याच पंचायत राज्य व्यवस्थेला गती देण्याचे काम आपण सर्वजण करत आहोत. प्रत्येक गावातील सरपंचही करत आहेत. महात्मा गांधींचे ग्राम विकासाचे  स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गावातील सरपंच आणि गावच्या प्रतिनिधींनी 75 झाडे लावली पाहिजेत. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरात आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना प्रत्येक गावात 75 झाडे लावली पाहिजेत."


"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण सर्वजण महात्मा गांधी यांच्या स्वप्नाशी कटिबद्ध आहोत. ज्या लोकांनी स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिले त्यांचे स्वप्न आपण पूर्ण केले पाहिजे. गुजरातमधील पंचायत व्यवस्थेत पुरुषांपेक्षा महिला प्रतिनिधिंची संख्या जास्त आहे. दीड लाखांहून अधिक निवडून आलेले लोकप्रतिनिधी एकत्र बसून गुजरातच्या उज्वल भविष्याविषयी चर्चा करतात. यापेक्षा मोठी संधी आणि मोठी लोकशाहीची शक्ती असू शकत नाही," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.   


महत्वाच्या बातम्या