नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था सातत्याने घसरत आहे. देशभरात महागाई वाढू लागली आहे. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत काहीही बोलत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून टीका सुरु आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर नरेंद्र मोदींनी देशाची अर्थव्यवस्था आणि जीएसटीबाबत भाष्य केले आहे. भारताच्या व्यापार आणि उद्योगांच्या शिखर संघटनेच्या (Associated Chambers of Commerce and Industry of India ) वार्षिक सभेत मोदी बोलत होते.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेची घोषणा केली. परंतु ही गोष्ट अचानक आलेली नाही. मागील पाच वर्षात देशाने स्वतःला मजबूत केलं आहे. त्यामुळे देश आता पाच ट्रिलिय अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहू शकतो. आमच्या सरकारने देशाची जीएसटीबाबतची मागणी पूर्ण केली. काँग्रेसला निशाणा करत मोदी म्हणाले की, 70 वर्षांची सवय बदलण्यासाठी थोडा वेळ लागेल.


या कार्यक्रमात बोलताना मोदींनी व्यापार आणि उद्योगांच्या शिखर संघटनेच्या सदस्यांचे कौतुक केले. मोदी म्हणाले की, आपल्या देशाकडे मोठे सामर्थ्य आहे. या सामर्थ्याच्या जोरावर आपण पुढे जाण्याचे लक्ष्य ठेवायला हवे. मोठे लक्ष्य समोर ठेवायला हवे. आपण सर्वांनी एकत्र येत लक्ष्य प्राप्त करण्यासाठी मेहनत करायला हवी. लक्ष्यप्राप्तीसाठी आपण स्वतःहून पुढाकार घेतला नाही तर तो एक सरकारी कार्यक्रम होईल.