मुंबई : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा आगामी आयपीएलसाठी झालेल्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं कमिन्सवर तब्बल साडेपंधरा कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली. आयपीएलच्या या लिलावात ऑस्ट्रेलियाच्याच ग्लेन मॅक्सवेलला 10 कोटी 75 लाख रुपयांची बोली लागली. किंग्स इलेव्हन पंजाबनं मॅक्सवेलवर पावणेअकरा कोटींची बोली लावली. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिसवर बंगलोरनं दहा कोटी रुपयांची बोली लावली. वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉटरेल आणि शिमरॉन हेटमायरला अनुक्रमे साडेआठ कोटी आणि पावणेआठ कोटी रुपयांची बोली लागली. कॉटरेलला पंजाबनं, तर हेटमायरला दिल्लीनं विकत घेतलं. लेग स्पिनर पियुष चावला हा भारताचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पियुष चावलाला चेन्नई सुपर किंग्सनं सहा कोटी 75 लाखांची बोली लावली.
यशस्वी जैस्वाल झाला करोडपती
मुंबईचा युवा अष्टपैलू आणि भारताच्या अंडर नाईन्टिन संघाचा सदस्य यशस्वी जैस्वालवर आयपीएलच्या लिलावात तब्बल 2 कोटी 40 लाखांची बोली लावण्यात आली. राजस्थान रॉयल्सनं ती किंमत मोजून यशस्वीला आगामी आयपीएलसाठी आपल्या ताफ्यात सामील केलं. विशेष म्हणजे त्यानं अजूनही वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली नाही. दक्षिण आफ्रिकेतल्या अंडर नाईन्टिन विश्वचषकासाठी यशस्वीची भारतीय संघात निवड झाली आहे. यंदाच्या मोसमात यशस्वीनं विजय हजारे करंडकात द्विशतक झळकावलं होतं.
48 वर्षांचा प्रवीण तांबे केकेआरकडे
मुंबईचा अनुभवी लेग स्पिनर प्रवीण तांबेनं वयाच्या 48 व्या वर्षी आयपीएलच्या रणांगणातलं आपलं स्थान कायम राखलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं त्याला आगामी आयपीएलसाठी आपल्या संघात स्थान दिलं आहे. कोलकात्यानं तांबेला 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या संघात सामील करुन घेतलं. प्रवीण तांबे हा सध्या 48 वर्षांचा आहे. त्यामुळं आयपीएलमध्ये खेळणारा तांबे हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरणार आहे. प्रवीण तांबेनं याआधीही आयपीएलच्या काही मोसमांत राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व केलं होतं.
उनाडकटचा भाव घसरला
सौराष्ट्राचा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला आयपीएलच्या लिलावात यंदा अवघी तीन कोटी रुपयांची बोली आली. राजस्थान रॉयल्सनं गेल्या मोसमासाठी उनाडकटला तब्बल साडेअकरा कोटींचा चढा भाव दिला होता. पण त्याच्या निराशानजक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर राजस्थाननं त्याला करारमुक्त केलं होतं. त्याच राजस्थाननं उनाडकटला यंदाच्या लिलावात तीन कोटी रुपयांत पुन्हा विकत घेतलं आहे.