नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारीला म्हणजेच सकाळी साडेदहा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरात कोविड 19 लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत. हा जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम असणार आहे. ज्याची व्याप्ती संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत असेल. याप्रसंगी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 3006 ठिकाणे आभासी पद्धतीने जोडली जाणार आहे. पहिल्या दिवशी प्रत्येक ठिकाणी सुमारे 100 लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.


हा लसीकरण कार्यक्रम करण्याच्या प्राधान्य गटांच्या तत्त्वांवर आधारित आहे आणि आयसीडीएस कामगारांसह सरकारी आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना या टप्प्यात ही लस मिळणार आहे.


लसीकरण कार्यक्रमात को-विन हा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेला एक डिजीटल प्लॅटफॉर्म वापरला जाणार आहे, ज्यायोगे लसीचा साठा, साठवणूक करण्यासाठी आवश्यक तापमान याबाबत वास्तविक माहिती आणि कोविड-19 लसीसाठी लाभार्थींचा वैयक्तिकरित्या मागोवा घेण्यास मदत होणार आहे.


नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सक्रिय सहकार्याने कोविशील्ड आणि कोवॅक्सि या दोन्ही लसींच्या पुरेशा मात्रा यापूर्वीच देशभरातील सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आल्या आहेत. राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारने त्या पुढे जिल्ह्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत. लोकसहभागाच्या तत्त्वांवर कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.


28 दिवसांच्या अंतराने लसीचा दुसरा डोस
कोरोना लसीकरणाविषयी, आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, "ही लस 28 दिवसांच्या फरकाने दिली जाईल आणि दुसरी लस दिल्यानंतर 14 दिवसानंतर लसीचा परिणाम सुरु होईल. डोस पूर्ण झाल्यानंतर 14 दिवसानंतर या लसीचा परिणाम दिसून येऊ शकेल. आम्ही लोकांना कोविड 19 संबंधित प्रोटोकॉलचे पालक करण्याचं आवाहन केलं आहे. लसीच्या दोन डोसांमध्ये 28 दिवसांचा फरक असेल."


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतून राज्यव्यापी कोविड लसीकरणाचा शुभारंभ

कोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (शनिवार 16 जानेवारी) सकाळी 11.30 वाजता मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रामध्ये होणार आहे. मुंबईत एकूण 9 केंद्रांवरील 40 बूथवर लसीकरण होणार आहे. सुरुवातीला दररोज सरासरी 4 हजार जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविड 19 आजारावरील 'कोविशील्ड' या लसीचे सुमारे 1 लाख 39 हजार 500 डोस उपलब्ध झाले आहेत. महानगरपालिकेकडे 1 लाख 30 हजार लसींची लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. या मोहिमेसाठी 7 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.