नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता जगभरातल्या भारतीय राजनयिक अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी देशाची निर्यात 400 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचं लक्ष्य आहे. याच मुद्द्यावर आजची बैठक होणार असून त्यामध्ये राजनयिक अधिकाऱ्यांसोबतच बिझनेस चेम्बर्स आणि निर्यात संघटनाही सहभागी होणार आहेत.


पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल उपस्थित असतील. उत्तर आमेरिका, युरोप आणि पूर्व आशिया या देशांत भारतीय निर्यात वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. चीनच्या वाढत्या व्यापारी वर्चस्वाचा सामना करण्यासाठी आणि परकीय व्यापारातील तूट कमी करण्यासाठी देशाची निर्यात वाढवणं अत्यावश्यक आहे. 


जुलैमध्ये 11 अब्ज डॉलर्सची व्यापारी तूट
भारताची जुलै 2021 मध्ये 11 अब्ज डॉलर्स इतकी व्यापारी तूट निर्माण झाली आहे. गेल्या पाच महिन्यात भारताच्या निर्यातीमध्ये 30 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलंय. पण एकीकडे निर्यात वाढ होत असली तरीही दुसरीकडे वाढती आयात भारताच्या चिंतेत भर टाकत आहे. 


कोरोना काळात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काही प्रमाणात मंदी निर्माण झाली होती. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून देशाच्या निर्यातीमध्ये वाढ करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. निर्यात वाढीमुळे देशाच्या महसूलात वाढ होते आणि अर्थव्यवस्थेला गती मिळते. जागतिक स्तरावर भारताने अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाशी सहकार्य करुन आंतरराष्ट्रीय व्यापारातील चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच युरोपसोबत सुरु असलेल्या मुक्त व्यापाराची चर्चेलाही अंतिम स्वरुप देण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.


महत्वाच्या बातम्या :