PM Modi on Bengaluru Opposition Meet : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधी पक्षांची बैठक (Bengaluru Opposition Meet) हे बेईमान लोकांचं संमेलन असल्याची टीका पंतप्रधानांनी केली आहे. बंगळुरुमध्ये देशातील सर्व विरोधी पक्षांची बैठक होत आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीत 26 पक्षांनी सहभाग नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे अंदमान-निकोबारवरील वीर सावरकर विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं उद्घाटन केलं. या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. 


पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा


पंतप्रधान मोदी यांनी बंगळुरुमध्ये भाजपचे विरोधकांच्या बैठकीवर जोरदार प्रहार केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधी पक्ष फक्त त्यांच्या कामांना प्राधान्य देतात, ज्यामुळे फक्त त्यांचा आणि त्यांचा कुटुंबाचा फायदा होतो. परिणामी या भागांचा विकास होतं नाही. यामुळे देशातील आदिवासी भाग आणि बेटांच्या विकासात अडथळे येतात आणि येथील जनता सुविधांपासून वंचित राहते. 


'2024 साठी 26 विरोधी पक्ष एकत्र''


पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, ''2024 साठी 26 पक्ष एकत्र येत आहेत. काही लोक भारताच्या दुर्दशा करण्यासाठी दुकान उघडून बसले आहेत. हे लोक देशासोबत बेईमानी करण्यासाठी संमेलन भरवत आहेत. हे लोक घोटाळेबाजांना मान देत आहेत. तुरुंगात जाणाऱ्या लोकांना विशेष सन्मान दिला जातो. आजकाल हे लोक बंगळुरूमध्ये जमले आहेत. हे जातीवादी आणि भ्रष्ट लोक आहेत. एका चेहऱ्यामागे अनेक चेहरे लपलेले आहेत.''






2024 मध्ये भाजपला निवडून देण्याचा जनतेचा निर्णय


पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांचा निशाणा साधत पुढे म्हणाले की, ''2024 साठी देशातील जनतेने आपले सरकार परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत भारताच्या दुर्दशेला जबाबदार असलेले काही लोक आपली दुकाने उघडून बसले आहेत. त्यांच्याकडे बघून मला एका कवितेची आठवण होते, 'गायत कुछ है, हाल कुछ है, लेबल कुछ है माल कुछ है'. हे गाण विरोधी पक्षांसाठी अनुकूल आहे,'' असं पंतप्रधान म्हणाले. 


'घराणेशाहीमुळे देशाचा विकास रखडला'


विरोधकांच्या सभेवर हल्लाबोल करताना पीएम मोदी म्हणाले, 'या लोकांना भ्रष्टाचाराची खूप आवड आहे. हे लोक घराणेशाहीचे समर्थक आहेत. हे लोक प्रथम कुटुंबासाठी काम करतात. कुटुंबावर आधारित पक्षाने देशाचा विकास केला नाही. बंगालमध्ये पंचायत निवडणुकीत हिंसाचार झाला, पण हे पक्ष काहीही बोलले नाहीत. दारू घोटाळ्यावरही हे पक्ष काहीच बोलत नाहीत.'


वीर सावरकर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं उद्घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे अंदमान-निकोबारवरील वीर सावरकर विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं उद्घाटन केलं आहे. सुमारे 710 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या कार्यान्वित झाल्यामुळे केंद्रशासित प्रदेशात संपर्क वाढेल. या नव्या टर्मिनलमुळे उड्डाणांची संख्या वाढून पर्यटनाला अधिक चालना मिळेल.