Dal Price : कांदा (onion) आणि टोमॅटोच्या (Tomato) वाढत्या किमतींनंतर नियंत्रणात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अशातच आता केंद्रीय अन्न मंत्रालयाने देशात चणाडाळ सवलतीच्या दरात विकण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारनं चणाडाळ 'भारत दाळ' या नावाने बाजारात कमी किंमतीत विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सरकार 60 रुपये किलो दराने हरभरा विकणार आहे. तर 30 किलो डाळीच्या पॅकेसाठी 55 रुपये प्रति किलो असा दरा निश्चित केला आहे. नाफेडकडून ही चणा डाळ कमी दरात विकली जात आहे. याशिवाय NCCF, केंद्रीय भंडार आणि मदर डेअरीच्या केंद्रांवरही डाळ विकली जाणार आहे. 


ग्राहकांना परवडण्याजोग्या दरात डाळ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न


केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी अनुदानित दरातील चणाडाळ विक्रीचा प्रारंभ केला. ‘भारत डाळ’ या ब्रँड अंतर्गत  विकल्या जाणाऱ्या एक किलो डाळीच्या पॅकसाठी 60 रुपये किलो तर 30 किलो डाळीच्या पॅकसाठी 55 रुपये प्रती किलो असा दर निश्चित करण्यात आला आहे.
नाफेड म्हणजेच राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाच्या दिल्ली-एनसीआर परिसरातील किरकोळ विक्री केंद्रांमध्ये चणा डाळीची विक्री होत आहे. भारत डाळ या ब्रँडची सुरुवात म्हणजे सरकारकडे असलेल्या साठ्यातील चण्याचे चणाडाळीत रुपांतर करुन ग्राहकांना परवडण्याजोग्या दरात डाळ उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने उचललेले प्रमुख पाऊल आहे.
चणाडाळ वितरणासाठी नाफेडने डाळ दळणे आणि ती पॅक करणे याची जबाबदारी स्वीकारली आहे. या व्यवस्थेअंतर्गत राज्य सरकारांना देखील त्यांच्या कल्याणकारी योजना, पोलीस कर्मचारी, तुरुंगातील जेवण व्यवस्था यांना होणाऱ्या पुरवठ्यासाठी आणि राज्यांच्या ग्राहक सहकारी दुकानांमध्ये विक्रीसाठी देखील ‘भारत डाळ’ या ब्रँडच्या डाळीचे वितरण केले जाते.


चणा हे  पोषक आरोग्यदायी लाभ देणारे कडधान्य


चणा हा कडधान्याचा प्रकार भारतात मुबलक प्रमाणात पिकवला जातो. तसेच संपूर्ण भारतात विविध प्रकारांमध्ये याचे सेवन करण्यात येते. चणे भिजवून, उकडून त्याची कोशिंबीर करतात तसेच ते भाजून चटपटीत खाण्यासाठी देखील वापर केला जातो. भाजी तयार करताना आणि सूपामध्ये तूरडाळीला पर्याय म्हणून तळलेली चणाडाळ वापरली जाते. चण्याचे पीठ म्हणजेच बेसन हा अनेक तिखट आणि गोड पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा मुख्य पदार्थ आहे. चण्यामध्ये मानवी शरीराला रक्ताल्पता, रक्तातील साखर, हाडांचे आरोग्य इत्यादी गोष्टी नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच मानसिक आरोग्य तंदुरुस्त राखण्यासाठी आवश्यक असलेले तंतुमय पदार्थ असतात. यामध्ये लोह,पोटॅशियम, बी जीवनसत्त्व, सेलेनियम, बीटा कॅरोटीन आणि कोलीन इत्यादी घटक मुबलक प्रमाणात आढळतात. चण्याला विविध पोषक आरोग्यदायी लाभ देणारे कडधान्य म्हटले जाते.


महत्त्वाच्या बातम्या:


Diet Tips : निरोगी राहायचे असेल तर मूग डाळ खा; फायदे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल