मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बातमध्ये शेतकरी आणि शेतपूरक व्यवसायांवर बोलताना पुणे आणि मुंबईत एका शेतकरी समूहाकडून चालवल्या जाणाऱ्या आठवडे बाजाराचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 3-4 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात फळे आणि भाज्यांना एपीएमसी कायद्याच्या परिघातून मुक्त करण्यात आले. यामुळे महाराष्ट्रातील फळे आणि भाज्या उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कसा बदल झाला, याचे उदाहरण आहे श्री स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. हा शेतकऱ्यांचा समूह आहे. पुणे-मुंबईमध्ये शेतकरी स्वतः आठवडी बाजार भरवतात. या बाजारांमध्ये सुमारे 70 गावांमधील 4,500 शेतकऱ्यांच्या उत्पादनांची थेट विक्री केली जाते. अडते नाहीत. ग्रामीण युवक या बाजारामध्ये खरेदी आणि विक्रीमध्ये सहभागी होतात. रोजगार मिळवतात, असं मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 27 सप्टेंबर रोजी देखील त्यांनी 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला.
शेतकरी आत्मनिर्भर भारताचा आधार
पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाचे कृषी क्षेत्र, आमचे शेतकरी, हे आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत. मागच्या काही काळात या क्षेत्राने अनेक बंधनातून स्वतःला मुक्त केले आहे, मला अनेक शेतकऱ्यांची पत्रे मिळत राहतात, या क्षेत्रात कशा प्रकारे बदल होत आहेत याबद्दल ते मला माहिती देत राहतात, असं मोदी म्हणाले.
Mann Ki Baat | पूर्वजांची गोष्टी सांगण्याची कला जपली पाहिजे : पंतप्रधान मोदी
मोदी म्हणाले की, आदरणीय गांधीजींचे विचार आणि आदर्श आजघडीला समयोचित आहेत. महात्मा गांधीजींचे आर्थिक विचार समजून घेतले असते, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरज भासली नसती. गांधीजींच्या आर्थिक विचारांमध्ये भारताची चांगली जाण दिसून येते, भारताचा सुगंध दरवळत राहतो, असंही मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण सर्व लोक, नव्या पिढीला आपल्या महापुरुषांबद्दल, महान माता आणि भगिनींबद्दल कथांच्या माध्यमातून माहिती देऊ शकतो. कथाशास्त्र अधिक लोकप्रिय कसे करू शकतो, यासाठी पोषक वातावरण कशा प्रकारे तयार करता येईल, याचा विचार करून त्या दिशेने काम केले पाहिजे, असं ते म्हणाले.
आपल्या पूर्वजांनी ज्या प्रथा सुरू केल्या होता, त्या किती महत्त्वाच्या होत्या आणि जेव्हा आपण त्यांचे पालन करत नाही तेव्हा आपल्याला त्यांचा किती अभाव जाणवतो, याची जाणीव आपल्याला या काळात निश्चितच झाली असेल. अशीच एक प्रथा म्हणजे गोष्टी सांगण्याची कला आहे, असं ते म्हणाले.
डिसलाईकमुळे गेल्या मन की बातची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 ऑगस्ट रोजी 'मन की बात' रेडिओवरील कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधला होता. परंतु या एपिसोडची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा झाली होती. कारण 'मन की बात' या कार्यक्रमाला यू ट्यूबवर लाईकपेक्षा डिसलाईकच जास्त मिळाले होते. पीएमओ असो किंवा नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या यू ट्यूब चॅनलवर लाईकची संख्या डिसलाईकपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं होतं. या कार्यक्रमात मोदींनी नीट, जेईई किंवा रोजगारी अशा कोणत्याही मुद्द्यांवर भाष्य न केल्याने विद्यार्थ्यांनी आपला रोष डिसलाईकच्या स्वरुपात व्यक्त केला होता.
2014 पासून सतत करत आहेत मन की बात
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 69 वी मन की बात आहे.