नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 27 सप्टेंबर रोजी देखील त्यांनी 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण सर्व लोक, नव्या पिढीला आपल्या महापुरुषांबद्दल, महान माता आणि भगिनींबद्दल कथांच्या माध्यमातून माहिती देऊ शकतो. कथाशास्त्र अधिक लोकप्रिय कसे करू शकतो, यासाठी पोषक वातावरण कशा प्रकारे तयार करता येईल, याचा विचार करून त्या दिशेने काम केले पाहिजे, असं ते म्हणाले.


आपल्या पूर्वजांनी ज्या प्रथा सुरू केल्या होता, त्या किती महत्त्वाच्या होत्या आणि जेव्हा आपण त्यांचे पालन करत नाही तेव्हा आपल्याला त्यांचा किती अभाव जाणवतो, याची जाणीव आपल्याला या काळात निश्चितच झाली असेल. अशीच एक प्रथा म्हणजे गोष्टी सांगण्याची कला आहे, असं ते म्हणाले.

शेतकरी आत्मनिर्भर भारताचा आधार 

पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाचे कृषी क्षेत्र, आमचे शेतकरी, हे आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत.  मागच्या काही काळात या क्षेत्राने अनेक बंधनातून स्वतःला मुक्त केले आहे,  मला अनेक शेतकऱ्यांची पत्रे मिळत राहतात, या क्षेत्रात कशा प्रकारे बदल होत आहेत याबद्दल ते मला माहिती देत राहतात, असं मोदी म्हणाले.

डिसलाईकमुळे गेल्या मन की बातची चर्चा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 ऑगस्ट रोजी 'मन की बात' रेडिओवरील कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधला होता. परंतु या एपिसोडची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा झाली होती. कारण 'मन की बात' या कार्यक्रमाला यू ट्यूबवर लाईकपेक्षा डिसलाईकच जास्त मिळाले होते. पीएमओ असो किंवा नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या यू ट्यूब चॅनलवर लाईकची संख्या डिसलाईकपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं होतं. या कार्यक्रमात मोदींनी नीट, जेईई किंवा रोजगारी अशा कोणत्याही मुद्द्यांवर भाष्य न केल्याने विद्यार्थ्यांनी आपला रोष डिसलाईकच्या स्वरुपात व्यक्त केला होता.


2014 पासून सतत करत आहेत मन की बात
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 69 वी मन की बात आहे.