PM Modi to visit Uttarakhand : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उत्तराखंडमध्ये 17,500 कोटी रुपयांच्या 23 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. 45 वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या लाखवार बहुउद्देशीय प्रकल्पाची पंतप्रधान मोदी यांनी पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8700 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांचे देखील उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी कुमाऊंसोबत प्रदीर्घ काळापासून संबंध असल्याची आठवण करून दिली. तसेच उत्तराखंडी टोपी देऊन सन्मानित केल्याबद्दल उत्तराखंडमधील लोकांचे आभार मानले.
उत्तराखंडमधील लोकांचे सामर्थ्य या दशकाला उत्तराखंडचे दशक बनवेल, असे पंतप्रधान म्हणाले. हे दशक उत्तराखंडचे दशक आहे, असे त्यांना का वाटते हे यावेळी पंतप्रधानांनी स्पष्ट केले. उत्तराखंडमध्ये वाढणारी आधुनिक पायाभूत सुविधा, चार धाम प्रकल्प, नवीन रेल्वे मार्ग बांधले जात आहेत, यामुळे हे दशक उत्तराखंडचे दशक ठरेल. जलविद्युत, उद्योग, पर्यटन, नैसर्गिक शेती आणि संपर्कव्यवस्था या क्षेत्रात उत्तराखंडने केलेल्या प्रगतीचाही त्यांनी उल्लेख केला ज्यामुळे हे दशक उत्तराखंडचे दशक होईल असे मोदी म्हणाले.
डोंगराळ भागांच्या विकासासाठी अथकपणे काम करणारा विचारप्रवाह आणि डोंगराळ प्रदेशांना विकासापासून दूर ठेवणारा विचारप्रवाह यातील फरक पंतप्रधानांनी स्पष्ट केला. ते म्हणाले की, 'विकास आणि सुविधांच्या अभावी अनेकांनी या प्रदेशातून इतर ठिकाणी स्थलांतर केले. सबका साथ सबका विकास या भावनेने सरकार काम करत आहे.' उधम सिंग नगर येथे एम्स ऋषिकेश उपग्रह केंद्र आणि पिथौरागढ येथील जगजीवन राम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायाभरणीमुळे राज्यातील वैद्यकीय पायाभूत सुविधा मजबूत होतील, असेही ते म्हणाले. आज जी पायाभरणी होत आहे ती प्रतिज्ञापत्रे आहेत ज्याचा पूर्ण संकल्पाने पाठपुरावा केला जाईल. ते म्हणाले की, भूतकाळातील वंचना आणि अडचणी आता सुविधा आणि सुसंवादात रूपांतरित होत आहेत. हर घर जल, शौचालय, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना यांच्या माध्यमातून गेल्या सात वर्षात महिलांना जीवनात नवनवीन सुविधा आणि सन्मान मिळत असल्याचेही मोदी यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान म्हणाले की, सरकार गंगोत्री ते गंगासागर या अभियानामध्ये गुंतले आहे. स्वच्छतागृहे, उत्तम सांडपाणी व्यवस्था आणि जलशुद्धीकरणाच्या आधुनिक सुविधांमुळे गंगेत पडणाऱ्या नाल्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्याचप्रमाणे नैनितालमधील तलावांची व्यवस्था ठेवली जात आहे. केंद्र सरकारने नैनिताल येथील देवस्थळ येथे देशातील सर्वात मोठी ऑप्टिकल दुर्बीण उभारली. यामुळे देश-विदेशातील शास्त्रज्ञांना नवी सुविधा तर मिळालीच, शिवाय या क्षेत्राला नवी ओळख मिळाली आहे. आज दिल्ली आणि डेहराडूनमध्ये सरकार सत्तेच्या लालसेने चालत नाही तर सेवेच्या भावनेने चालते.