Covaxin : देशात ओमायक्रॉनबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशभरात रात्री संचारबंदी लावण्यात आली आहे. दैनंदिन रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंतेत भर पडली आहे. देशभरात लसकरण वेगानं सुरु करण्यात आलं आहे. ओमायक्रॉनच्या या संकटात दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारत बायोटेकने (Bharat Biotech) लहान मुलांसाठी Covaxin सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. गुरुवारी भारत बायोटेकने (Bharat Biotech) सांगितले की, 'दोन वर्ष ते 18 वर्ष मुलांवरील Covaxin च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक आले आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्यातील चाचणीत दोन वर्ष ते 18 वर्ष मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याचे समोर आलं आहे. लहान मुलांसाठी ही लस सुरक्षित आहे. ' 


दुसऱ्या लाटेत अनेक लहान मुलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातच दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन हा व्हेरियंट लहान मुलांमध्ये अधिक वेगानं संक्रमित होत असल्याचे काही निष्कर्षांमध्ये समोर आलं होतं. त्यामुळे भारत बायटेकने संकटात सकारात्मक बातमी दिली आहे. भारत सरकारने लसीकरणाला मान्यता दिल्यानंतर आता लवकरच दोन वर्षांवरील मुलांचेही लसीकरण सुरु होईल. यामुळे भारतातील लसीकरणाला आणखी वेग मिळणार आहे. 




 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांच लसीकरण सुरू करत असल्याची घोषणा केलीय. येत्या 3 जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गाईडलाईन्स जारी केलीय. त्यानुसार प्रसुतीगृह आणि महापालिकेची 350 लसीकरण केंद्रे याठिकाणी लहान मुलांचे लसीकरण होईल. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल कदाचित वेगळी असेल. आरोग्य मंत्रालायानं नुकतीच लहान मुलांचं लसीकरण (वय 15-18), आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि जेष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केलीय. येत्या तीन जानेवारीपासून 15-18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे.