PM Modi Gujarat Visit : पंजाब वगळता चार राज्यात भाजपने आघाडी घेतली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगींची जादू चालली आहे. तर गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्येही भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. चार राज्यात घवघवीत यश मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. 11 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अहमदाबाद विमानतळावर आगमन होणार आहे. विमानतळापासून गांधीनगर कमलम भाजप कार्यालयापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे. याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या मार्गावर जवळपास 50 स्टेज तयार करम्यात आले आहेत. या पूर्ण मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोमध्ये जवळपास चार लाख नागरिक येण्याची शक्यता आहे. दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यलायत बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान गुजरात पंचायत महासंमेलनात सहभागी होतील आणि संमेलनाला संबोधित करतील. त्यानंतर सायंकाळी राजभवनात आराम करणार आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाच्या (RRU) इमारतीचे राष्ट्रार्पण करणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आरआरयूच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला ते संबोधित करतील. पंतप्रधान संध्याकाळी 6:30 च्या सुमारास, 11 व्या 'खेल महाकुंभाची' घोषणा करतील आणि समारंभाला संबोधित करतील.


गुजरातमध्ये त्रिस्तरीय पंचायती राज रचना असून 33 जिल्हा पंचायती, 248 तालुका पंचायती आणि 14,500 हून अधिक ग्रामपंचायती आहेत. ‘गुजरात पंचायत महासंमेलन: आपनू गाव, आपनू गौरव’ (आपले गाव,आपला गौरव) मध्ये राज्यातील पंचायती राज संस्थांच्या तिन्ही संस्थांमधील 1 लाखांहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाची (RRU) स्थापना पोलिसिंग, फौजदारी न्याय आणि सुधारात्मक प्रशासनाच्या विविध शाखांमध्ये उच्च गुणवत्तेच्या प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी करण्यात आली. गुजरात सरकारने  2010 मध्ये स्थापन केलेल्या रक्षा शक्ती विद्यापीठाचे उन्नयन करून सरकारने राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ नावाचे राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ स्थापन केले. राष्ट्रीय महत्त्वाची संस्था असलेल्या या विद्यापीठाचे कामकाज 1ऑक्टोबर 2020 पासून सुरू झाले. उद्योग क्षेत्रातील ज्ञान आणि संसाधनांचा फायदा घेत विद्यापीठ खाजगी क्षेत्रासोबत  समन्वय विकसित करेल आणि पोलीस व सुरक्षाविषयक विविध क्षेत्रात उत्कृष्टता केंद्रेदेखील स्थापन करेल.


आरआरयूमध्ये पोलिसिंग आणि अंतर्गत सुरक्षेच्या विविध क्षेत्रांमध्ये डिप्लोमा ते डॉक्टरेट स्तरापर्यंत शैक्षणिक कार्यक्रम, जसे की पोलिस विज्ञान आणि व्यवस्थापन, फौजदारी कायदा आणि न्याय, सायबर मानसशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा, गुन्हे अन्वेषण, धोरणात्मक भाषा, अंतर्गत संरक्षण आणि धोरणे, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा, किनारपट्टी आणि सागरी सुरक्षा, असे विविध अभ्यासक्रम आहेत. सध्या 18 राज्यातील 822 विद्यार्थ्यांची नोंदणी विद्यापीठात आहे.