Election Results 2022 : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे काँग्रेसला या पाच पैकी एकाही राज्यात सरकार स्थापन करता येणार नाही. दरम्यान, पाच राज्यांतील निकालावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. " जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे. ज्यांनी  विजय मिळवला त्यांचे अभिनंदन. मी सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांचे त्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल आभार मानतो. या निकालातून आम्ही शिकू आणि लोकांच्या हितासाठी काम करत राहू." असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 


आज जाहीर झालेल्या निकालामध्ये काँग्रेसचा पुरता सुपडा साफ झाला आहे. एकाही राज्यात काँग्रेसला यश मिळवता आलेले नाही. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस फक्त दोन जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे  उत्तराखंडमध्ये 18, पंजाबमध्ये 18, गोव्यात 11 आणि मणिपूरमध्ये चार जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता गेली असून तेथील 117 जागांपैकी आम आदमी पक्ष 92 जागांवर आघाडीवर आहे.  


पंजाब आणि गोव्यात काँग्रेसला विजयाची आशा होती. परंतु, दोन्ही राज्यात काँग्रेसचा पराभव झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये तर कांग्रेसची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या पराभवानंतर काँग्रेसने ट्विट केले की, "लोकशाहीत सार्वजनिक विवेक आणि सार्वजनिक व्यवस्था सर्वोपरी आहे. जनतेच्या जनादेशाचा आदर करत आम्ही जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. महागाई, बेरोजगारी, सरकारी मालमत्तेचा लिलाव, महिला, दलित अत्याचार आणि जनतेच्या सर्व प्रश्नांवर आमचा लढा सुरूच राहणार आहे."






दरम्यान, गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असेलल्या उत्तर प्रदेशमधील रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत. हा काँग्रेससाठी मोठा हादरा मानला जात आहे. भाजपचे उमेदवार या ठिकाणाहून आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. रायबरेली मतदारसंघात नुकत्याच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आदिती सिंह 4 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर  येथे काँग्रेस उमेदवाराला दुसऱ्या फेरीअखेर फक्त 940 मतं मिळाली आहेत. भाजप उमेदवाराने याठिकाणी मोठी आघाडी घेतली आहे.


महत्वाच्या बातम्या