PM Modi Chhattisgarh Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज छत्तीसगड दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान मोदी यांनी छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) 26,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. यावेळी त्यांनी सभेला संबोधित करत छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधत राज्यातील गुन्हेगारी वाढल्याचं खापर काँग्रेस सरकारवर फोडलं आहे. काँग्रेस सरकारमधील नेते फक्त स्वत:चे खिसे भरत असल्याचा आरोपही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. छत्तीसगडच्या जनतेच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचा भाजपचा निर्धार आहे, असं वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी जगदलपूरमध्ये 'परिवर्तन महासंकल्प रॅली'ला संबोधित करताना केलं आहे.


पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा


पुढच्या वर्षी छत्तीसगडमध्ये निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. या पार्श्नभूमीवर पंतप्रधांन मोदींचा हा दौरा फार महत्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित करत काँग्रेस सरकारवर टीका करत म्हटलं आहे की, 'छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने राज्याची अवस्था बिकट केली आहे. सर्वजण या सरकारला कंटाळले आहेत, राज्यात भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे. कधीकधी असे दिसते की राजस्थान आणि छत्तीसगड गुन्हेगारी दरांवर एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. इथला विकास पोस्टरवर किंवा काँग्रेस सरकारच्या नेत्यांच्या लॉकरमध्ये दिसतो. छत्तीसगड बदलाची मागणी करत आहे.'






'पहिला हक्क गरिबांचा'


पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'आजपर्यंत काँग्रेसने दुसऱ्या देशासोबत कोणता गुप्त करार केला, हे उघड केले नाही. पण देश पाहत आहे की, या करारानंतर काँग्रेस देशाबद्दल आणखी वाईट बोलू लागली आहे. त्यांना भारतातील काहीही आवडत नाही असं दिसतं.' असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या या नव्या कारस्थानापासून सावध राहायला हवं, असा इशाराही दिला आहे. 'जर देशाच्या साधनसंपत्तीवर हक्काचा प्रश्न असेल तर पहिला हक्क गरिबांचा आहे', असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.


'गरीबांचं कल्याण हेच माझे ध्येय'


छत्तीसगडमध्ये विकास हा केवळ पोस्टर आणि बॅनरमध्ये असल्याचं दिसतंय असं पंतप्रधान मोदी म्हणाले. अटलजींच्या सरकारने छत्तीसगडची निर्मिती केली. काँग्रेसने छत्तीसगडमध्ये विकासाचा खोटा प्रचार केला आहे. काँग्रेसने बस्तरकडे अनेक दशके दुर्लक्ष केले. भाजप आदिवासी समाजासाठी पाचपट बजेट देते. जगदलपूरमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''काँग्रेस म्हणतंय, जितकी लोकसंख्या जास्त तितके अधिकार. मी म्हणतो की, या देशात सर्वात जास्त लोकसंख्या असेल तर ती गरीब आहे, म्हणून माझे ध्येय गरीबांचे कल्याण आहे.''


छत्तीसगडच्या जनतेला पंतप्रधान मोदींची भेट


छत्तीसगडमधील स्वावलंबी भारताच्या दृष्टीकोनाला गती देण्यासाठी पंतप्रधान मोंदींला विविध प्रकल्प आणि योजनांचं लोकार्पण केलं. पंतप्रधान बस्तर जिल्ह्यातील नागरनार येथे असलेल्या NMDC स्टील लिमिटेडच्या स्टील प्लांटचे उद्घाटन केलं. पंतप्रधान मोदी यांनी छत्तीसगडमध्ये 26,000 कोटींच्या विविध प्रकल्पाची पायाभरणी केली.


महत्वाच्या इतर बातम्या :


Pakistan Earthquake : पाकिस्तानात विनाशकारी भूकंपाची होणार, भारतालाही धोका? वैज्ञानिकाच्या भविष्यवाणीने खळबळ