नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर असून ते सध्या लाईफ सपोर्ट सिस्टमवर आहेत, अशी माहिती ‘एम्स’कडून देण्यात आली. त्यांच्यावर गेल्या नऊ आठवड्यांपासून उपचार सुरु आहेत. मात्र गेल्या 24 तासात प्रकृती जास्त खालावल्याची माहिती हॉस्पीटलने दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्समध्ये जाऊन अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या अगोदर भाजपाध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीही प्रकृतीची विचारपूस केली होती.


93 वर्षीय अटल बिहारी वाजपेयी 11 जून 2018 रोजी उपचारासाठी एम्समध्ये दाखल झाले आहेत. किडनीच्या आजारामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. वाजपेयी 2009 सालापासूनच आजारी आहेत. त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागतो. अटल बिहारी वाजपेयी हे डिमेंशिया आजाराने त्रस्त आहेत.

याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह देशातील अनेक महत्त्वाचे नेत्यांनी एम्समध्ये जाऊन अटल बिहारी वाजपेयींच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. वाजपेयींना मूत्र संसर्ग झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.

काय आहे डिमेंशिया?

वाजपेयींना तुम्ही-आम्ही जाहीर कार्यक्रमांत पाहून आता जवळपास नऊ वर्षे झाली आहेत. 2009 सालापासून ते अंथरुणाला खिळून आहेत. सभा, मैफली आपल्या अमोघ वक्तृत्वाने गाजवणारा हा नेता अचानक समाजापासून एकाकी पडला. तब्बल एक दशक त्यांना असं बेडवर पडून  काढावं लागतंय. या अफाट व्यक्तिमत्वाला ज्या आजाराने जखडलंय त्या आजाराचं नाव आहे डिमेन्शिया अर्थात स्मृतीभ्रंश...

डिमेन्शिया पीडित रुग्णांमध्ये आढळणारं सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे शॉर्ट मेमरी लॉस. वयाची साठी ओलांडली की डिमेन्शियाची शक्यता बळावत जाते. वयपरत्वे माणसाची स्मरणशक्ती कमीच होते. पण अलजायमर या मेंदूशी निगडीत रोगामुळे डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढते. अलजायमरमुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते आणि त्यात डिमेन्शियाची भर पडली की परिस्थिती गंभीर बनते. अशा रुग्णाला सतत निगराणीखाली ठेवण्याची आवश्यकता असते.

डिमेन्शियामधला स्मृतीभ्रंश हा अनेकदा घातक ठरतो. तुम्ही माणसाची नावं विसरता, तुम्ही परिचित ठिकाणंही विसरता इतपर्यंत ठीक आहे. पण अनेक केसेसमध्ये माणसं पुन्हा घरी यायचं देखील विसरतात, असं दिशाहीन भटकत असतानाच डिमेन्शिया पेशंटचे अपघाती मृत्यू अधिक झालेले आहेत. दिल्लीतल्या मनोहर लाल शर्मा यांची केसतर याबाबतीत फार भयानक आहे. पाच दिवस घराबाहेर भटकल्यानंतर डिहायड्रेशनमुळेच त्यांचा मृत्यू झाला. कारण, पाणी प्यायची आठवण सुद्धा त्यांना राहिली नाही. त्यामुळे आजार साधा दिसत असला तरी कधीकधी तो इतकं भयानक रुप घेतो.