मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वाघा बॉर्डरवर होणाऱ्या परडेची प्रत्येकाला उत्सुकता असते. प्रत्येकाच्या हातात तिरंगा आणि वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दणाणून जातो. या घोषणांचा आवाज पाकिस्तानपर्यंत पोहोचवण्यासाठी बीएसएफने आपल्या एका खास सुरक्षा रक्षकाला ही जबाबदारी दिलेली आहे. गेल्या पाच वर्षांपासून या जवानाला पाहून प्रत्येक भारतीयामध्ये उत्साह संचारतो.


बीएसएफ जवान अभिषेक असं त्यांचं नाव आहे. एका मोटिव्हेटरच्या भूमिकेत अभिषेक दरवर्षी या परेडमध्ये नवा रोमांच निर्माण करतात आणि प्रत्येक भारतीयाला खिळवून ठेवतात. अभिषेक यांच्या प्रत्येक इशाऱ्यावर देशभक्तीचा असा उत्साह संचारतो, की प्रत्येक उपस्थित भारतीय देशभक्तीच्या घोषणा देतो. डोळ्यावर काळा चष्मा लावणं अभिषेक कधीही विसरत नाहीत. हातात तिरंगा घेऊन देशभक्तांसोबत स्वतःही या उत्सवात सहभागी होतात.



अटारी-वाघा बॉर्डरच्या पलिकडे पाकिस्तानचेही जवान असतात. पाकिस्तानचे नागरिकही तिथे उपस्थित असतात आणि त्यांचाही आवाज ऐकू येतो. मात्र अभिषेक ज्या पद्धतीने देशभक्ती जागी करतात, ते पाकिस्तानकडून कधीही दिसत नाही. भारतीयांच्या वंदे मातरमच्या घोषणांपुढे पाकिस्तानचा आवाजही ऐकायला येत नाही. अभिषेक यांच्या एका इशाऱ्यावर उपस्थित भारतीय भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडतात.

अभिषेक मूळचे झारखंडचे आहेत. त्यांचे वडीलही सैन्यात होते. देशभक्तीचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं आहे.



समोर पाकिस्तानचीही जनता असते आणि ते आपले कट्टर प्रसिस्पर्धी आहेत, त्यामुळे उत्साह कैकपटीने वाढतो, असं अभिषेक सांगतात. अभिषेक यांची वाघासारखी डरकाळी पाहता गेल्या पाच वर्षांपासून ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. बीएसएफचे मोठे अधिकारीही अभिषेक यांचं कौतुक करतात.

उत्साह निर्माण करण्यात बीएसएफ जवानाची मोठी भूमिका असते. मोटिव्हेटरमुळे परेड मोठ्या उत्साहात पार पडते, असं बीएसएफचे डीआयजी जेएस ओबेरॉय सांगतात. अभिषेक यांचा आवाज ऐकून अंगात देशभक्ती संचारते, असं एबीपी न्यूजशी बोलताना एका पर्यटकाने सांगितलं. असं वाटतं की देशासाठी काहीही करावं, अशी भावना निर्माण होत असल्याचं पर्यटक सांगतात.



अटारी-वाघा बॉर्डर भारतीयांसाठी देशभक्तीचं तीर्थस्थळ मानलं जातं. इथे प्रत्येक जण हातात तिरंगा घेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करतो. हातात तिरंगा घेऊन तो अभिमानाने मिरवण्याचा हा क्षण असतो.