गुवाहाटी : भारताचं स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी दिलेल्या बलिदानाचं महत्त्व 70 वर्षांनीही आजच्या पिढीला वाटत असल्याचं अनेक वेळा पाहायला मिळतं. कंबरेपर्यंत साचलेल्या पाण्यात उभं राहून तिरंग्याला सलाम ठोकणाऱ्या आसाममधील विद्यार्थ्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून ऊर अभिमानाने भरुन येत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.


आसाममधील धुब्री जिल्ह्याला पावसाचा जोरदार तडाखा बसला. पुराच्या पाण्यातही एक व्यक्ती तीन मुलांसह तिरंग्याला सलामी देत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. यातील लहानग्यांपैकी एकाच्या कंबरेपर्यंत तर दोघांच्या छातीपर्यंत पाणी भरलं आहे.

आसाममधील धुब्रीतल्या नस्कारा पूर्व प्राथमिक शाळा क्रमांक 1185 मधले शिक्षक मिझनुर रहमान यांनी हा फोटो शेअर केला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सकाळी फेसबुक पोस्ट केलेल्या या फोटोला संध्याकाळपर्यंतच 60 हजारांपेक्षा जास्त शेअर्स मिळाले आहेत. पुराच्या पाण्यामुळे शाळेतील 170 विद्यार्थ्यांपैकी एकही जण उपस्थित राहू शकलेला नाही.

पाहा पोस्ट :