चंदिगढ : शाळेतील स्वातंत्र्यदिन सोहळ्यावरुन परतणाऱ्या 12 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना चंदिगढमध्ये घडली आहे. शस्त्रधारी आरोपींनी अपहरण करुन बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.


इयत्ता आठवीत शिकणारी संबंधित विद्यार्थिनी तिरंगा फडकवत शाळेतून घरी परत येत होती. त्यावेळी एका माणसाने वाट अडवून तिला सेक्टर 23 मधील चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्कमध्ये नेलं. त्याठिकाणी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. स्वातंत्र्यदिनामुळे भरदिवसा घटनास्थळाशेजारील परिसरात फारशी गर्दी नव्हती.

पीडितेची स्थानिक रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रेपबाबत कुठेही वाच्यता न करण्याची धमकी देऊन आरोपीने तिला सोडून दिलं. पीडितेने कुटुंबीयांना याबाबत सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.

काहीच दिवसांपूर्वी चंदिगढमध्ये महिलांनी कँडल मार्च काढून सुरक्षित वातावरणाची आग्रही मागणी केली होती. आता ऐन स्वातंत्र्यदिनी घडलेल्या या घटनेमुळे संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.