मुंबई : कर्नाटक निवडणुकीनंतर सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. कर्नाटकमध्ये प्रचार संपतो ना संपतो तोच, इकडे तोटा भरुन काढण्याच्या नावाखाली पेट्रोल- डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. पेट्रोल आज 33 पैशांनी तर डिझेल 15 पैशांनी वाढलं. इंधनाचे दर पैशात वाढत असले, तरी त्याचा परिणाम रुपयात होतो.


त्यामुळे मुंबईत या घडीला पेट्रोलचे दर प्रती लीटर 84 रुपये 73 पैसे तर डिझेलचे दर 72 रूपये 36 पैसे झाले आहेत. तर दिल्लीत पेट्रोल 76.87 रुपये तर डिझेल 68 रुपये प्रति लिटर झालं आहे. या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आजवरचा सर्वात उच्चांक गाठला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे आणि रुपयाचं मूल्य कमी झाल्यामुळे इंधन दर भारतात वाढले आहेत. मात्र दरवाढीला कारणीभूत यापेक्षाही महत्त्वाचं कारण आहे, केंद्र सरकारची एक्साईज ड्युटी आणि विविध राज्यांमध्ये लागणारे कर आणि सेस.

दिल्ली सरकारने लावलेले सर्व कर काढून टाकले, तर दिल्लीत पेट्रोलचे दर निम्म्यापेक्षाही खाली येतील.

शेजारच्या देशांमध्ये स्वस्त पेट्रोल

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे भारताची तुलना शेजारच्या राष्ट्रांशी होऊ लागली आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, सार्क (SAARC) देशांमध्ये भारत वगळता, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, भूटान आणि बांगलादेशमध्ये पेट्रोल भारतापेक्षा स्वस्त आहे.

भारतापेक्षा गरीब देश स्वस्त दरांमध्ये पेट्रोल देऊ शकतात, तर भारताला काय हरकत आहे? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून मिळणारा महसूल वाढवण्याचा सरकारचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळेच राज्यांचे कर आणि केंद्राची एक्साईज ड्युटी यामुळे सर्वसामान्यांना झळ सोसावी लागत आहे.

शेजारच्या राष्ट्रांमध्ये पेट्रोलची प्रति लिटर किंमत

पाकिस्तान- 51.79

नेपाळ- 67.46

श्रीलंका- 64

भूटान- 57.24

अफगाणिस्तान- 47

बांगलादेश- 71.55

चीन- 81

म्यानमार- 44

(14 मे 2018 पर्यंतची आकडेवारी, स्रोत-ग्लोबल पेट्रोल प्राईस)