नवी दिल्ली : आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप केला जात आहे, मात्र काँग्रेसने तर संपूर्ण तबेलाच विकून खाल्ला आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली. कर्नाटक मतदान, निवडणूक निकाल आणि नंतर सत्ता स्थापनेच्या नाट्यमय घडामोडी या सर्व गोष्टींनंतर पहिल्यांदाच अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


“कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ओलीस ठेवले. काँग्रेस आणि जेडीएसने आपल्या आमदारांना विजयी रॅली काढण्याची परवानगी जरी दिली असती, तरी कर्नाटकात आज भाजपची सत्ता असती.”, असे अमित शाह म्हणाले.

कर्नाटकमध्ये भाजप मोठा पक्ष असल्याने आम्ही सत्ता स्थापनेचा दावा केला. मात्र गोवा किंवा मणिपूरमध्ये काँग्रेसने मोठा पक्ष असतानाही सत्ता स्थापनेचा दावा केला नव्हता, त्यांचे नेते आराम करत होते, असे अमित शाह म्हणाले. तसेच, काँग्रेस पक्ष इतिहास विसरला असून, देशात सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे काम त्यांनीच केले आहे, असा आरोपही अमित शाह यांनी केला.

अमित शाह पुढे म्हणाले, “भाजपतर्फे मी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानत असून, या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. याआधी आम्हाला 40 जागा होत्या, आता 104 जागा मिळाल्या आहेत. मतदानाची टक्केवारीही वाढली आहे.”

“काही लोक म्हणत आहेत की, पूर्ण बहुमत नसताना भाजपने सरकार बनवण्याचा दावा का केला? कर्नाटकमध्ये कुणालाच बहुमत मिळाले नाही. मग काय पुन्हा निवडणुका घ्याव्यात? सर्वात मोठ्या पक्षाच्या नात्याने भाजपने सरकार बनवण्याचा दावा केला होता.”, असे अमित शाह यांनी सांगितले.

पाहा अमित शाह यांची संपूर्ण मुलाखत :