मुंबई : भारतात निपाह व्हायरसच्या रुपाने नवं संकट समोर उभं राहिलं आहे. या व्हायरसची लागण झाल्याने केरळच्या कोझिकोडमध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जणांवर उपचार सुरु आहेत. चिंतेची बाब म्हणजे, या विषाणूवर कोणताही उपचार होत नाही.

दरम्यान, केंद्र सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. यासाठी कालच केरळला डॉक्टरांचं पथक दाखल झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा यांनी दिली. मृतांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.

आणखी 25 जणांच्या रक्ताच्या तपासणीमध्ये 'निपाह' विषाणू असल्याचं निष्पन्न झालंय. विषाणूची लागण होऊ नये यासाठी खजूर खाणं टाळले पाहिजे, त्याबरोबरच जमिनीवर पडलेली फळं खाणं टाळावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. यावरुन राज्यभरात आरोग्य संस्थांना काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.

निपाह व्हायरस कसा पसरतो?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, निपाह व्हायरस (NiV) वेगाने पसरतो, जो मनुष्य आणि प्राण्यांमध्ये गंभीर आजाराला जन्म देतो.

NiV च्या बाबतीत सर्वात अगोदर 1998 साली मलेशियातील कम्पंग सुगाई निपाह येथून माहिती मिळाली होती. तेव्हापासूनच या व्हायरसला हे नाव देण्यात आलं.

त्यावेळी डुकरांपासून हा आजार पसरला जात होता.

मात्र नंतर ज्या ज्या ठिकाणी हा व्हायरस आढळून आला, तिथे हा व्हायरस पसरण्यामागचं कोणतंही नेमकं कारण आढळून आलं नाही. बांगलादेशमध्येही 2004 साली काही लोकांना या व्हायरसची लागण झाली होती.

बांगलादेशमधील या लोकांनी खजूरच्या झाडापासून मिळणारा द्रव पदार्थ खाल्ल्याचं समोर आलं होतं.

दरम्यान, या व्हायरसचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला झाल्याची उदाहरणं भारतातही पाहायला मिळाली आहेत. NiV मुळे श्वसन प्रक्रियेसंबंधी गंभीर आजार होतो.

मनुष्य किंवा प्राण्यांना या आजारापासून दूर ठेवण्यासाठी आतापर्यंत कोणतीही लस तयार झालेली नाही.

आजाराची लक्षणं काय?

या आजाराची लक्षणं रुग्णाला 24 ते 48 तासामध्ये कोमात पोहोचवतात. आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीला श्वास घेण्यासाठी त्रास होतो, तर काही रुग्णांना न्यूरोलॉजिकल समस्याही (मज्जासंस्थेसंबंधी) होते.

1998-99 सालामध्ये हा आजार पसरला तेव्हा जवळपास 265 जणांना या आजाराची लागण झाली होती, असं बोललं जातं. रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या जवळपास 40 टक्के रुग्णांना गंभीर आजार झाला होता, ज्यामुळे त्यांना वाचवता आलं नाही.

सर्वसाधारणपणे वटवाघूळ, डुक्कर किंवा मनुष्यांद्वारे हा आजार पसरतो. मलेशिया आणि सिंगापूरमध्ये डुक्करांच्या माध्यमातून हा आजार पसरल्याचं समजलं होतं, तर भारत आणि बांगलादेशमध्ये मनुष्यांपासूनच या आजाराचा संसर्ग होण्याची भीती जास्त आहे.

काय काळजी घ्याल?

या आजारापासून दूर राहण्यासाठी खजूर, खजूरच्या झाडापासून मिळणारा द्रव पदार्थ आणि झाडाखाली पडलेली फळं खाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. शिवाय डुक्कर, आजारी घोडे किंवा इतर जनावरांपासून दूर राहणंही गरजेचं आहे.