नवी दिल्ली : देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 19 पैशांची वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. मुंबईमध्ये पेट्रोलच्या किंमतीने शंभरी कधीच पार केली आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 101.71 रुपये तर डिझेलची किंमत 93.77 रुपये इतकी आहे. तर दिल्लीत पेट्रोलची किंमत ही 95.56 रुपये तर डिझेलची किंमत 86.47 रुपये इतकी आहे. 


देशातील महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि लड्डाख या सहा ठिकाणी पेट्रोलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि देशातील पेट्रोलच्या किंमतीत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली. गेल्या महिन्याच्या 4 तारखेपासून आतापर्यंत 22 व्या वेळी पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. ही वाढ 5.15 रुपये इतकी आहे. 


महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमतीत घट होत असताना भारतात मात्र इंधनाच्या दरात वाढ होत आहे. 


देशात 15 जून  2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात. 


भारतात केंद्राचा 33 तर राज्याचा 32 रुपये कर
सध्या केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 32.98 प्रति लिटर तर डिझेलवर 31.83 रुपये प्रती लिटर इतका कर लागतो. आता यावरच कर थांबत नाही. राज्य सरकार त्यावर वेगळा कर लावते. महाराष्ट्र सरकार पेट्रोलच्या किंमतीवर 25 टक्के व्हॅट लावते तर डिझेलवर 21 टक्के व्हॅट लावते. आता यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर 10 रुपये प्रती लिटर तर डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर इतका सेस लावण्यात येतो. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत. 


पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx   पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.


महत्वाच्या बातम्या :