भिवंडी : पावसाळ्याच्या तोंडावर ठिकठिकाणी नालेसफाईच्या कामांना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून, लोकप्रतिनिधींकडून नालेसफाईची पाहणी केली जात आहे. बऱ्याचदा हे अधिकारी, लोकप्रतिनिधी नाल्याच्या कडेला उभं राहून कामाची पाहणी करताना आपण नेहमीच पाहतो. इथे त्यांचे फोटोसेशनही होतं. पण भिवंडीत नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी महिला आरोग्य निरीक्षक थेट मॅनहोलमध्ये उतरल्या. त्यांच्या या कृतीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.


भिवंडीतील प्रभाग समिती क्रमांक दोन अंतर्गत शांतीनगर, आझाद नगर, चावींद्रा, अवचित पाडा, खंडू पाडा या भागातील पाणी वाहून नेण्यासाठी भलामोठा नाला या ठिकाणाहून आरिफ गार्डन इथून पुढे जातो. इथल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी स्थानिक वार्ड क्रमांक दोनच्या आरोग्य निरीक्षक सुविधा सुभाष चव्हाण यांच्यावर आहे. नाल्याच्या सफाई कामावर प्रत्यक्ष हजर राहून देखरेख करत असताना नक्की काम किती झाले हे पाहण्यासाठी, सुविधा चव्हाण या थेट मॅनहोलमधून भल्यामोठ्या नाल्यात उतरल्या. किती काम झालं, नक्की काय काम झालं हे पाहण्यासाठी एक महिला अधिकारी आपला पदर कंबरेला खोचून नाल्यात उतरली याचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे.


आयुक्तांनी नुकतीच माझी नियुक्ती प्रभारी आरोग्य निरीक्षक पदावर केली आहे. आपलं काम प्रामाणिकपणे करावंच, पण ते आपलं कर्तव्य आहे या भावनेतून मी काम केलं. त्यासाठीच मी नाल्यात उतरले, अशी प्रतिक्रिया सुविधा सुभाष चव्हाण यांनी दिली.


नालेसफाईवरील कोट्यवधी रुपये पाण्यात कसे जातात? 


- भिवंडी महापालिका क्षेत्रामध्ये प्रत्येक वर्षी नालेसफाईच्या कामांवर कोट्यावधी रुपये खर्च करुनही शहरातील सखल भागांसोबतच रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याच्या घटना नेहमीच घडतात. यंदाच्या पावसाळ्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्धा मे महिना उलटून गेला तरीही नालेसफाईची निविदा प्रक्रिया काही पूर्ण झाली नाही आणि त्यामुळे प्रभाग समिती क्रमांक तीन, चार आणि पाच या तीन प्रभागांची निविदा प्रक्रिया झाल्याने तिथल्या कामाला सुरुवात झाली. तर उर्वरित प्रभाग समिती क्रमांक एक आणि दोन ठिकाणी महापालिकेने रोजंदारीवरील मजूर घेऊन नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे.


- भिवंडी शहरात एकूण पाच प्रभाग समिती अंतर्गत 42 हजार 734 मीटर लांबीचे नाले असून त्यापैकी प्रभाग समिती क्रमांक 3, 4 आणि 5 मधील 25 हजार 687 मीटर लांबीचे काम (प्रभाग समिती क्र.3 -10156 मीटर - 21,04486 - शुभम कन्स्ट्रक्शन, प्रभाग समिती क्र. 4 - 8214 मीटर - 22,82814 - तुषार मोहन चौधरी, प्रभाग समिती क्र.5 - 7317 मीटर - 23,54587 - शुभम कन्स्ट्रक्शन) या ठेकेदारांना एकूण 25687 मीटर लांबीचे नाला सफाईचे काम 67 लाख 41 हजार 887 रुपयांना देण्यात आलं आहे तर उर्वरित प्रभाग समिती क्रमांक 1 आणि 2 या ठिकाणी निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने तेथे रोजंदारीवर कामगार घेऊन नालेसफाई सुरु केली आहे.


- प्रभाग समिती 1 आणि 2 मधील एकूण 17 हजार 047 मीटर लांबीच्या नालेसफाईसाठी अनुक्रमे 29,08584 आणि 26,84766 अशी एकूण 55 लाख 93 हजार 350 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण आकडेवारी पाहिल्यास 42 हजार 734 मीटर लांबीच्या नालेसफाईवर 1 कोटी 23 लाख 35 हजार 237 रुपये खर्च केले जाणार आहेत तर आतापर्यंत 55.07 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासन करत आहे. परंतु नुकताच दोन दिवसांपूर्वी एक तास पडलेल्या पावसात शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. त्यामुळे नालेसफाईचा दावा फोल ठरला असून तीनबत्ती भाजी मार्केट, कल्याण रोड, पद्मानगर, निजामपुरा, कणेरी, कमला हॉटेल, नारपोली, शिवाजी नगर भाजी मार्केट, नजराना कंपाऊंड इथल्या सखल भागात शिरलं होतं.