Petrol-Diesel Price Today 8 March 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी (Oil Companies) पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) चे आजचे दर जारी केले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती बदललेल्या नाहीत. काल सर्व पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकींच्या सर्व टप्प्यातील मतदान संपलं. त्यामुळे आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. मात्र नागपुरात सीएनजीच्या (CNG) किमतीत मात्र मोठी वाढ झाली आहे.
चार महिन्यांहून अधिक काळापासून देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. देशात पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी मतदानाचा कालचा शेवटचा दिवस होता. पाचही राज्यांच्या निवडणुकांचा निकाल 10 मार्च रोजी लागणार आहे. अशातच देशात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा एकदा उच्चांक गाठू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ (Petrol-Diesel Price) होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे ( 5 State assembly election) दरात वाढ झाली नसल्याचं मानलं जात आहे.
पाहा व्हिडीओ : नागपुरात पेट्रोल, डिझेलपेक्षा सीएनजी महाग! सीएनजीचे दर प्रतिकिलो 120 रुपयांवर
रशिया-युक्रेन युद्धामुळं (Russia-Ukraine War) जगाची चिंता वाढली आहे. अशातच दोन देशांतील युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 139 डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचली आहे. 2012 नंतर प्रथमच कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका उडाला आहे. असं असलं तरी देशात मात्र गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर (Changes in Petrol Diesel Rtae) आहेत.
एबीपी माझा कट्ट्यावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे तज्ज्ञ गिरीश कुबेर यांनी युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धाच्या जगावर झालेल्या परिणामांबाबात बोलताना देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांवरही भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की, देशात चार महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. अशातच सध्या स्थिर असलेल्या दरांमुळे पेट्रोल कंपन्यांना प्रति लिटर 23 रुपये तोटा होत आहे.
सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ पाहता पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रति लिटर 10 ते 12 रुपये दर वाढ होणार हे नक्की. पण, दर एकाच वेळी वाढवणार का दररोज 2 ते 3 रुपयांनी वाढणार हे सांगता येणार नाही. ते निर्णय कंपनी घेतील अशी प्रतिक्रिया फामफेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किंमतीमध्ये वाढ होणार हे आता स्पष्ट झालं आहे. सरकार पेट्रोलच्या किमती सरसकट वाढवणार की, पेट्रोल-डिझेलच्या एक्साईज ड्यूटी कमी करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.