नवी दिल्ली : एकीकडे देशभरात 16 जानेवारीला लसीकरणासाठी सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे याच संधीचा आगामी निवडणुकांसाठी फायदा उठवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे.


मुंबईत पहिल्या टप्यातील लसीकरणासाठी 1 लाख 39 हजार 500 कोव्हीशिल्ड लस दाखल झाल्या आहेत. मुंबईतील एफ दक्षिण विभागात बुधवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास या लसींना घेऊन कडेकोट पोलीस बंदोबस्तात एक व्हॅन मुंबईत दाखल झाली. आज महाराष्ट्रातील मुंबईसह 13 राज्यांमध्ये लसी पोहचवण्यात आल्या आहेत. यानंतर 14 जानेवारी पर्यत सर्व राज्यात 1.65 कोटी डोस पोहचवण्यात येणार आहेत.


विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राला पहिल्या टप्यात 5 लाख 63 हजार डोस देण्यात येणार आहेत अशी माहिती महापालिकेने दिली होती परंतु त्यातील केवळ 1 लाख 39 हजार 500 चं डोस मुंबईत दाखल झाले आहेत तर दुसरीकडे पश्चिम बंगालला सर्वाधिक म्हणजे तब्बल 10 लाख डोस पाठवण्यात आलेत. त्यामुळेच आता विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.


खरंतर इतर राज्यांच्या तुलनेत टाळेबंदीत महाराष्ट्रातील कोरोनाची टक्केवारी ही 30 टक्के होती. त्यामुळे महाराष्ट्रला जास्त लसींची आवश्यकता होती. परंतु प्रत्यक्षात मात्र केंद्र सरकारने जादा लसींचा साठा कोलकाताला पाठवला आहे आणि त्यामुळेच विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी हे आरोप स्पष्ट शब्दात नाकारले आहेत.


भाजपने आगामी बंगालच्या निवडणुकांसाठी जोरदार रणनीती आखली आहे. त्यासाठी भाजपकडे कोरोना लस हा हुकमी एक्का आहे. त्याचा ते जोरदार प्रचार करतील यात तीळ मात्र शंका नाही. परंतु विरोधक देखील सरकारचा हा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही.