नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून पाठवण्यात आलेल्या कोरोना लसीचे दहा लाख डोस दक्षिण आफ्रिकेला परत करायचे आहेत. इकॉनॉमिक टाइम्सने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केलं आहे. याआधी आम्ही कोरोना लसीकरण अभियानात अॅस्ट्राजेनेकाच्या लसीचा वापर करणार नाही, असं दक्षिण आफ्रिकेने जाहीर केलं होतं.


सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ओळख कोरोना लसीचा पुरवठा करणारी प्रमुख कंपनी म्हणून निर्माण झाली आहे. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राजेनेकाच्या लसीची उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये होत आहे. मागील आठवड्यातच दक्षिण आफ्रिकेत सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादित झालेल्या कोरोना लसीचे दहा लाख डोसची पहिली बॅच पोहोचली होती. तर पाच लाख डोसची पुढची बॅच पुढील काही आठवड्यातच तिथे पोहोचणार होती.


दरम्यान सीरम इन्स्टिट्यूटने याबाबत भाष्य करण्यास नकार दिला आहे.


coronavirus | कोरोना व्हायरसच्या दक्षिण आफ्रिकन आणि ब्राझीलियन व्हेरिएंटची भारतात एन्ट्री


दक्षिण आफ्रिकन व्हेरिएंटविरोधात ही लस कमी प्रभावी असल्याचं समोर आल्यानंतर अॅस्ट्राजेनेकेच्या लसीचा वापर करण्यावर स्थगिती देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य मंत्री ज्वेली मिखाइज यांच्यासह देशातील अनेक वैज्ञानिकांनी कोरोना लसीच्या परीक्षणाचे नमुने जाहीर केले. परंतु अॅस्ट्राजेनेकाच्या लसीबाबत चिंता व्यक्त केली. ही लस B.1.351 व्हेरिएंटविरोधात कमी प्रभावी असल्याचं समोर आलं. या व्हेरिएंट सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेतच आढळला होता. त्यामुळे 8 फेब्रुवारीपासून सुरु होणारं लसीकरण अभियान रोखण्यात आलं.


दक्षिण आफ्रिकेत कोरोना लसीकरण अभियानाला अद्याप सुरुवात झालेली नाही. तिथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जॉन्सन अॅण्ड जॉन्सनची कोरोना लस देण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेने घेतला आहे. ही लसीकरण मोहीम संशोधकांसह एका अभ्यासाप्रमाणे होईल.


जागतिक आरोग्य संघटनेने सोमवारी (15 फेब्रुवारी) अॅस्ट्राजेनेकाची कोरोना लस अर्थात कोविशील्डला जगभरात कुठेही आपत्कालीन वापराला मंजुरी दिली होती.