मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा चढता आलेख खाली उतरताना दिसत नाही. देशात सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 25 पैशांनी वाढ झाली आहे. त्यानंतर दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 89.54 रुपयांवर पोहोचली आहे आणि एक लिटर डिझेलची किंमत 79.95 रुपयांवर पोहोचली आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 100.07 रुपये दराने विकले जात आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलचे दर 96 रुपयांवर पोहोचले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 96 आणि डिझेलचे दर 86.97 रुपये आहेत. इतर शहरांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दररोज विक्रमी वाढ होताना दिसत आहे.
Special Report : इंधन दरवाढीचा कशा कशावर परिणाम होतो?
देशातील प्रमुख पाच शहरातील दर
- मुंबई - पेट्रोल 96 रुपये, डिझेल 86.97 रुपये
- बंगळुरू - पेट्रोल 92.48 रुपये, डिझेल 84.72 रुपये
- चेन्नई - पेट्रोल 91.73 रुपये, डिझेल 85.05 रुपये
- कोलकाता - पेट्रोल 90.79 रुपये, डिझेल 83.54 रुपये
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. बेंचमार्क क्रूड ऑईल 63 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेलं आहे. आंतरराष्ट्रीय फ्युचर्स मार्केट इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज (आयसीई) मधील बेंचमार्क क्रूड ऑईल मंगळवारीच्या सत्रात 0.51 टक्क्यांनी वधारून 63.62 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं होतं. न्यूयॉर्क मर्केंटाइल एक्सचेंजवर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटच्या (डब्ल्यूटीआय) मार्च कॉन्ट्रॅक्टमध्ये सत्रातील 1.31 टक्क्यांनी वाढून 60.25 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं होतं.
सध्या उत्पादन शुल्क कमी करण्याचा विचार नाही - सरकार
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी संसदेत सांगितले होते की, सध्या पेट्रोलियम पदार्थांवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा विचार नाही. जागतिक बाजारपेठेतील कोविड संकटानंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 61 डॉलरवर गेली आहे. भारताला इंधनाची गरज भागवण्यासाठी 80 टक्के आयातीवर अवलंबून राहावं लागत आहे. केंद्र सरकार पेट्रोलवर प्रतिलिटर 32.09 रुपये आणि डिझेलवर 31.80 रुपये उत्पादन शुल्क आकारत आहे.