नवी दिल्ली : गेल्या सहा वर्षाच्या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर 300 टक्क्याहून अधिक कर लावण्यात आल्याची कबुली केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी लोकसभेत दिली. या संबंधिच्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना अनुराग ठाकुर म्हणाले की, "मोदी सरकार सत्तेत यायच्या आधी 2014-15 सालच्या दरम्यान पेट्रोलच्या उत्पादन शुल्कातून 29,279 कोटी रुपये आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कातून 42,881 कोटी रुपये कमावण्यात आले आहेत."
गेल्या 2020-21 या आर्थिक वर्षात सुरुवातीच्या दहा महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवरील करात वाढ करण्यात आली असून त्यातून 2.94 लाख कोटी रुपये कमवण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत होती. मार्च महिन्यात या किंमती स्थिर झाल्याचं पहायला मिळालं.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असताना देशात आता पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किंमती स्थिर राहिल्या आहेत हे विशेष. मुंबईत पेट्रोलची किंमत 97.57 रुपये इतकी आहे तर डिझेलची किंमत ही 88.60 रुपये इतकी आहे. दिल्लीमध्ये हाच दर अनुक्रमे 91.17 आणि 81.47 रुपये इतका आहे.
सध्या केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 32.98 प्रति लिटर तर डिझेलवर 31.83 रुपये प्रती लिटर इतका कर लागतो. आता यावरच कर थांबत नाही. राज्य सरकार त्यावर वेगळा कर लावते. महाराष्ट्र सरकार पेट्रोलच्या किंमतीवर 25 टक्के व्हॅट लावते तर डिझेलवर 21 टक्के व्हॅट लावते. आता यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर 10 रुपये प्रती लिटर तर डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर इतका सेस लावण्यात येतो. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत.
देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.
संबंधित बातम्या :
- केंद्र सरकारची प्रति लिटर पेट्रोलमागे 33 रुपये तर डिझेलमागे 32 रुपयांची घसघशीत कमाई, संसदेत दिली कबुली
- Petrol and Diesel price | पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर, सामान्यांना मोठा दिलासा