नवी दिल्ली: इस्त्रायलच्या कंपनीने तयार केलेल्या स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील पत्रकार, विरोधी पक्षाचे नेते आणि प्रमुख व्यक्ती यांच्यावर केंद्र सरकारने पाळत ठेवल्याचा आरोप 16 माध्यम समूहांनी एका मालिकेतून केला आहे. त्यानंतर देशात राजकीय रणकंदन सुरु झालं असून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस या मुद्द्यावरुन गाजण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरुन विरोधकांनी आज सकाळी 10 वाजता बैठक बोलावली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संध्याकाळी सहा वाजता बैठक बोलावली आहे. 


केंद्रीय मंत्र्यांवर पाळत
काल पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देशाचे नवे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सभागृहाला सांगितलं की, भारत सरकारचा या हेरगिरी प्रकरणात कोणताही हात नाही, अशा प्रकारची हेरगिरी झाली नाही. पण पुढच्या दोन तासांत काही हेरगिरी करण्यात आलेल्या काही लोकांची यादी आली. त्यामध्ये स्वत: अश्विनी वैष्णव आणि प्रल्हाद पटेल यांचीही नावं होती. राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी आणि प्रशांत किशोर या तिघांच्यावरही पाळत ठेवला असल्याचं सांगण्यात आलं. 


माजी सरन्यायाधीश आणि केंद्रीय निवडणूक सह-आयुक्तांवर पाळत
भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता त्या महिलेवर आणि तिच्या आजूबाजूच्या सर्व नातेवाईकांवर या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवल्याचा दावा या यादीत करण्यात आला आहे. नंतर हे प्रकरण दडपण्यात आलं. या प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून सरकारला पूरक असे निकाल येऊ लागल्याचं सांगण्यात येतंय. सवैधानिक पदावर काम करणाऱ्या माजी केंद्रीय निवडणूक सह-आयुक्त अशोक लवासा यांच्यावरही पाळत ठेवण्यात आली होती. हे प्रकरण 2019 सालच्या लोकसभा निवडणूकीपूर्वीचे आहे. 


दोन वर्षांपूर्वी, 2019 साली हे स्पायवेअर पहिल्यांदा चर्चेत आलं होतं. त्यावेळी व्हॉट्सअॅपने भारतातील काही पत्रकारांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना एक मेसेज करुन त्यांच्या स्मार्टफोनमध्ये पेगॅसस या स्पायवेअरने हेरगिरी केल्याचं सांगितलं होतं. या स्पायवेअरच्या माध्यमातून आपल्या फोनमध्ये हेरगिरी होत असल्याचं आणि गोपनीय डेटा चोरी होत असल्याची जराही कल्पना येत नाही इतकं ते गुप्तपणे काम करतं. त्यामुळे जगभरातील अनेक देशांच्या सरकारांनी आपल्या देशातील पत्रकार आणि विरोधात बोलणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी याचा वापर केल्याचं समोर आलं आहे. पेगॅसस स्पायवेअरला इस्त्रायलच्या सायबर सिक्युरिटी कंपनी एनएसओने तयार केलं आहे. 


पेगॅसस कसं काम करतं?
पेगॅसर स्पायवेअर हा असा प्रोग्रॅम आहे की ज्याने एखाद्या स्मार्टफोनमध्ये प्रवेश केला तर त्या स्मार्टफोनचा मायक्रो फोन, कॅमेरा, ऑडिओ, टेक्ट्स मेसेज, ई-मेल आणि लोकेशन अशी कोणतीही माहिती मिळवू शकतो. महत्वाचं म्हणजे व्हॉट्सअॅपचे एन्क्रिप्टेड ऑडिओ आणि मेसेजही या स्पायवेअरच्या माध्यमातून हॅक करता येतात आणि त्याचे डिकोड करता येते. एन्क्रिप्टेड मेसेज असे मेसेज असतात की ज्याची माहिती फक्त पाठवणाऱ्या आणि वाचणाऱ्या व्यक्तीला असते. ज्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मचा वापर करुन हे मेसेज शेअर करण्यात येतात त्या कंपनीलाही ते मेसेज वाचता येत नाहीत. 


पेगॅसेस स्पायवेअर आपल्या फोनमध्ये कसा येतो? 
हा स्पायवेअर एखाद्या व्यक्तीच्या फोनमध्ये टाकायचा असेल तर त्याला फक्त व्हॉट्सअॅप कॉल करावा लागतो. समोरच्या व्यक्तीने तो कॉल उचलला नाही तरीही हा स्पायवेअर त्याच्या फोनमध्ये प्रवेश करतो. हा स्पायवेअर अॅन्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्रकारांना प्रभावित करु शकतो.


दहशतवादावर नियंत्रणासाठी वापर, कंपनीचा दावा
एनएसओ या इस्त्रायली कंपनीने सांगितले आहे की,  हे स्पायवेअर फक्त सरकारी एजन्सीना विकण्यात आलं आहे. त्याचा उद्देश केवळ दहशतवादाविरोधात लढणे हाच आहे. त्यामुळे जगभरातील हजारो लोकांचे प्राण वाचू शकतात. पण या स्पायवेअरचा गैरवापर करुन जगभरातील अनेक देशांच्या सरकारांनी आपल्याच देशातील पत्रकारांवर नजर ठेवल्याचं स्पष्ट झालं आहे. 


संबंधित बातम्या :