नवी दिल्ली: इस्त्रायलच्या एनएसओ या फर्मवेअरने तयार केलेलं पेगॅसस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जगभरातील दहा देशांच्या सरकारांनी या स्पायवेअरचा वापर करुन आपल्याच देशाच्या पत्रकार आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन हॅक केले आणि हेरगिरी केला असल्याचा आरोप अॅमनेस्टी इंटरनॅशनलने केला आहे.  ब्रिटनमधील वृत्तपत्र द गार्जियननं एक रिपोर्ट केला आहे. त्यात असा आरोप केला आहे की, पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार, वकिलांसह काही महत्वाच्या व्यक्तिंची हेरगिरी केली जात आहे. यात भारताचाही समावेश असून भारतातील 40 हून अधिक पत्रकार, तीन विरोधी पक्षातील नेते, सरकारमधील दोन मंत्री, सुरक्षा एजन्सीमधील अधिकारी आणि काही उद्योजकांचा समावेश आहे.  


भारत सरकारनं गार्जियनच्या दावा फेटाळला, म्हणाले, सर्वांची प्रायव्हसी सुरक्षित
गार्जियननं दावा केल्यानंतर भारत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. भारत सरकारकडून सांगण्यात आलं आहे की, भारतात एक मजबूत लोकशाही आहे. इथं खाजगी आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा सन्मान केला जातो. भारतात पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा लागू आहे, त्याअंतर्गत सर्वांची प्रायव्हसी सुरक्षित आहे. सरकारनं म्हटलं आहे की,  गार्जियनच्या स्टोरीमध्ये पुराव्याशिवाय निष्कर्ष काढले गेले आहेत.  


Pegasus Spyware : काय आहे पेगॅसस स्पायवेअर? ते तुमचे व्हॉट्सअॅप कसे हॅक करु शकते?


गार्जियननं काय आरोप केलेत 
गार्जियननं केलेल्या रिपोर्टनुसार हेरगिरीचं हे सॉफ्टवेअर इस्त्राईलमधील सर्विलेंस कंपनी NSO नं देशांच्या सरकारला विकलं आहे. गार्जियनच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून 50 हजारहून अधिक लोकांची हेरगिरी करण्यात येत आहे. यामध्ये  अजरबैजान, बहरीन, कझाकिस्तान, मॅक्सिको, मोरक्को, रवांडा, सौदी अरब, हंगरी, भारत आणि संयुक्त अरब अमीरात अशा देशांचा डेटाचा समावेश आहे.  


 पेगॅसस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत
 इस्त्रायलच्या एनएसओ या फर्मवेअरने तयार केलेलं पेगॅसस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जगभरातील दहा देशांच्या सरकारांनी या स्पायवेअरचा वापर करुन आपल्याच देशाच्या पत्रकार आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन हॅक केले आणि हेरगिरी केला असल्याचा आरोप अॅमनेस्टी इंटरनॅशनलने केला आहे. यामध्ये भारत सरकारचाही समावेश असून भारतातील 40 पत्रकारांवर या स्पायवेअरच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात आल्याचा संशय आहे. पेगॅससच्या माध्यमातून गोपनीय असलेल्या व्हॉट्सअॅपच्या मेसेजवरही नजर ठेवण्यात आल्याचं स्पष्ट झालंय.


दोन वर्षांपूर्वी, 2019 साली हे स्पायवेअर पहिल्यांदा चर्चेत आलं होतं. त्यावेळी व्हॉट्सअॅपने भारतातील काही पत्रकारांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना एक मेसेज करुन त्यांच्या स्मार्टफोनमध्ये पेगॅसस या स्पायवेअरने हेरगिरी केल्याचं सांगितलं होतं. या स्पायवेअरच्या माध्यमातून आपल्या फोनमध्ये हेरगिरी होत असल्याचं आणि गोपनीय डेटा चोरी होत असल्याची जराही कल्पना येत नाही इतकं ते गुप्तपणे काम करतं. त्यामुळे जगभरातील अनेक देशांच्या सरकारांनी आपल्या देशातील पत्रकार आणि विरोधात बोलणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी याचा वापर केल्याचं समोर आलं आहे. पेगॅसस स्पायवेअरला इस्त्रायच्या सायबर सिक्युरिटी कंपनी एनएसओने तयार केलं आहे. या कंपनीची स्थापना 2008 साली झाली होती. 


पेगॅसस कसं काम करतं?


पेगॅसर स्पायवेअर हा असा प्रोग्रॅम आहे की ज्याने एखाद्या स्मार्टफोनमध्ये प्रवेश केला तर त्या स्मार्टफोनचा मायक्रो फोन, कॅमेरा, ऑडिओ, टेक्ट्स मेसेज, ई-मेल आणि लोकेशन अशी कोणतीही माहिती मिळवू शकतो. महत्वाचं म्हणजे व्हॉट्सअॅपचे एन्क्रिप्टेड ऑडिओ आणि मेसेजही या स्पायवेअरच्या माध्यमातून हॅक करता येतात आणि त्याचे डिकोड करता येते. एन्क्रिप्टेड मेसेज असे मेसेज असतात की ज्याची माहिती फक्त पाठवणाऱ्या आणि वाचणाऱ्या व्यक्तीला असते. ज्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मचा वापर करुन हे मेसेज शेअर करण्यात येतात त्या कंपनीलाही ते मेसेज वाचता येत नाहीत. 



पेगॅसस स्पायवेअर आपल्या फोनमध्ये कसा येतो? 


हा स्पायवेअर एखाद्याच्या फोनमध्ये टाकायचा असेल तर त्याला फक्त व्हॉट्सअॅप करावा लागतो. समोरच्या व्यक्तीने तो कॉल उचलला नाही तरीही तरी हा स्पायवेअर त्याच्या फोनमध्ये प्रवेश करतो. हा स्पायवेअर अॅन्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्रकारांना प्रभावित करु शकतो.


दहशतवादावर नियंत्रणासाठी वापर, कंपनीचा दावा


एनएसओ या इस्त्रायली कंपनीने सांगितले आहे की,  हे स्पायवेअर फक्त सरकारी एजन्सीना विकण्यात आलं आहे. त्याचा उद्देश केवळ दहशतवादाविरोधात लढणे हाच आहे. त्यामुळे जगभरातील हजारो लोकांचे प्राण वाचू शकतात. पण या स्पायवेअरचा गैरवापर करुन जगभरातील अनेक देशांच्या सरकारांनी आपल्याच देशातील पत्रकारांवर नजर ठेवल्याचं स्पष्ट झालं आहे.