मुंबई : पतंजली आयुर्वेदचे मालक आचार्य बालकृष्ण यांनी फोर्ब्सच्या टॉप-25 श्रीमंत भारतीयांच्या यादीत स्थान पटकावलंय. बाबा रामदेव यांचे सहकारी असलेल्या आचार्य बालकृष्ण यांची संपत्ती दोन वर्षात दुप्पट झालीय.


आचार्य बालकृष्ण यांची संपत्ती 32.5 हजार कोटी रुपये असल्याची फोर्ब्सने नमूद केलंय. 2016 च्या तुलनेत ही संपत्ती दुप्पट आहे.

बाबा रामदेव यांच्यासोबत स्थापन केलेल्या पतंजली आयुर्वेदमध्ये आचार्य बालकृष्ण यांचा वाटा 98.6 टक्के आहे. पतंजलीच्या वाढीमुळेच आचार्य बालकृष्ण यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. पतंजलीचं वार्षिक उत्पन्न 11.8 हजार कोटी रुपये आहे. हर्बल प्रॉडक्ट, FMCG प्रॉडक्टसह अन्य प्रॉडक्टच्या उत्पादनासह विक्री पतंजलीमार्फत केलं जातं. पतंजलीचं संपूर्ण कामकाज आचार्य बालकृष्णच सांभाळतात.  अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि बिगबास्केट यांसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करुन पतंजलीने आपली उत्पादनं जगभरात पोहोचवली आहेत.

46 वर्षीय आचार्य बालकृष्ण 2016 मध्ये फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत 48 व्या स्थानी होते. त्यावेळी त्यांची संपत्ती 16.5 हजार कोटी रुपये होती. त्यावेळी डॉलरची किंमत 66 रुपये होती, आज 74 रुपये आहे. आता आचार्य बालकृष्ण यांची संपत्ती 32 हजार कोटी रुपये असून, ते श्रीमंत भारतीयांच्या यादीत पहिल्या 25 मध्ये पोहोचले आहेत. तर जगातल्या श्रीमंतांच्या यादीत आचार्य बालकृष्ण 274 व्या स्थानी आहेत.

दरम्यान, आगामी काळात गायीचं दूध, टेलिकॉम क्षेत्र इत्यादींमध्येही पतंजली उतरणार आहे. पतंजलीचा व्यवसाय दिवसागणिक कित्येक पटीने वाढत असला तरी शेअर बाजारातही पतंजली कंपनी लिस्ट करण्याचा विचार नसल्याचे आचार्य बालकृष्ण यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले आहे.