अमरोहा (उत्तर प्रदेश) : दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीहल्ला, अश्रुधूर आणि पाण्याचा मारा करणाऱ्या भाजप सरकारचा उत्तर प्रदेशातील अमरोहातील धनौरा तालुक्यात अनोख्या पद्धतीने निषेध केलाय. धनौरा तालुक्यातील रसूलपूर माफीच्या ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवरच फलक लावून, भाजप नेत्यांना गावात येण्यास बंदी असल्याचे जाहीर केलंय.


रसूलपूर माफी गावातील ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करुन एक फलक तयार केलंय. ‘भाजप नेत्यांना गावात येण्यास सक्त मनाई आहे. आल्यास त्यांनी आपल्या जीवाचं रक्षण स्वत:चं स्वत: करावं.’, असा इशाराच रसूलपूर माफीच्या ग्रामस्थांनी भाजपला दिलाय.

जर आमच्या गावात भाजप नेते मतं मागण्यासाठी आले, तर ज्याप्रकारे दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला, त्याचप्रकारे भाजप नेत्यांचं आमच्या गावात स्वागत केले जाईल, असे रसूलपूर माफीतल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

विशेष म्हणजे, केवळ फलक लावून इथले ग्रामस्थ शांत बसले नाहीत, तर गावात येणाऱ्या-जाणाऱ्यांवर नजर ठेवण्यात येते आहे. त्यात कुणी भाजपचा नेता दिसला, तर त्याची खैर नाही, असं ग्रामस्थांनी ठरवलंय.

रसूलपूर माफी गावात जवळपास एक हजार मतदार आहेत. आगामी निवडणुकीत म्हणजे 2019 च्या निवडणुकीत या गावातून भाजपला एकही मत दिले जाणार नाही, असे ठरवण्यात आले आहे.

या गावाच्या सीमेवरील भाजपविरोधी फलकाचे फोटो सध्या सोशल मीडियावरही वेगात व्हायरल होत असून, फलक पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी आजूबाजूच्या गावातील लोकही येत आहेत.

बिजनौरमधून खास फलक पाहण्यासाठी आलेले शिवसेना नेते विजय मोहन गुप्ता यांनी गावातील लोकांशी बोलताना सांगितले की, बिजनौरमध्येही अशाचप्रकारचं फलक लावण्यात येईल. एकंदरीत, दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर पोलिसांकरवी झालेल्या लाठीहल्ल्याबद्दल देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असल्याचे दिसून येते आहे.