नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. या पाचही राज्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.


छत्तीसगडमध्ये 12 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. मध्य प्रदेश आमि मिझोराममध्ये एकाच टप्प्यात 28 नोव्हेंबरला, तर तेलंगणा आणि राजस्थानमध्ये एकाच टप्प्यात 7 डिसेंबरला मतदान होईल. त्यानंतर चारच दिवसात म्हणजे 11 डिसेंबरला पाच राज्यांचा निकाल लागणार आहे.

तेलंगणा विधानसभा काही दिवसांपूर्वीच भंग करण्यात आली आहे. टीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही दिला होता. तर दुसरीकडे मिझोराम या राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आहे.

मध्य प्रदेश

2013 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 165 जागांसह बहुमत मिळवलं होतं. 231 सदस्यसंख्या असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे 57, तर बसपाचे चार आमदार आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर सत्ता राखण्याचं आव्हान आहे.

राजस्थान

राजस्थान विधानसभेची एकूण सदस्यसंख्या 200 आहे. 2013 सालच्या निवडणुकीत भाजपने 160 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. तर काँग्रेसला केवळ 25 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. यावेळी काँग्रेस आणि भाजपची थेट टक्कर असेल.

छत्तीसगड

91 सदस्यसंख्या असलेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपने 2013 साली 49 जागा मिळवल्या होत्या. तर काँग्रेसचे 39 आमदार आहेत. त्यामुळे आता छत्तीसगडमध्येही भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी लढत होणार आहे.

तेलंगणा

मागच्या निवडणुकीत 119 सदस्यसंख्या असलेल्या तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत टीआरएसने 90, काँग्रेस 13, एमआयएम सात, भाजप पाच, टीडीपी तीन आणि सीपीआय (एम) ने एका जागेवर विजय मिळवला होता.

मिझोराम

40 सदस्यसंख्या असलेल्या मिझोराममध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. मिझोराम हे काँग्रेसच्या हातात असलेलं ईशान्येकडील एकमेव राज्य आहे. मिझोराममध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 34 जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती. भाजपचा सध्या या विधानसभेत एकही आमदार नाही.