नवी दिल्ली : केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन (Parliament Special Session) बोलावले आहे. या अधिवेशनात कोणत्या मुद्यांवर चर्चा होणार, यावर अनेक मते व्यक्त होत असताना कामकाजाची विषय पत्रिका समोर आली आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात स्वातंत्र्याच्या 75 वर्षांतील भारताच्या कामगिरीपासून ते संविधान सभेपर्यंत सर्व गोष्टींवर चर्चा होणार आहे. विषयपत्रिकेत चार विधेयकेही मंजूर करण्याचा प्रस्ताव आहे.
केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवल्यानंतर विषयपत्रिका जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक मुद्यांवर चर्चा सुरू होती. आता, या विशेष अधिवेशनाची विषयपत्रिका समोर आली आहे. विशेष अधिवेशनातील प्रस्तावित चार विधेयकांमध्ये अॅडव्होकेट बिल वृत्तमाध्यमे आणि नियतकालिकांची नोंदणी विधेयक 2023, पोस्ट ऑफिस विधेयक आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त विधेयक यांचा समावेश आहे. संसदेचे विशेष अधिवेशन 18 सप्टेंबरपासून सुरू होत असून ते 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये पाच बैठका होणार आहेत.
3 ऑगस्ट रोजी राज्यसभेत अधिवक्ता (सुधारणा) विधेयक 2023, प्रेस आणि नियतकालिक नोंदणी विधेयक 2023 मंजूर झाले आहेत. हे विधेयक आता लोकसभेत मांडले जाणार आहेत. 10 ऑगस्ट रोजी, पोस्ट ऑफिस विधेयक, 2023 आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवा शर्ती आणि पदाचा कालावधी) विधेयक, 2023 राज्यसभेत सादर करण्यात आले, ज्यावर आता विशेष सत्रादरम्यान चर्चा केली जाणार आहे.
संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या आधी केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 17 सप्टेंबर रोजी ही बैठक पार पडणार आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनाची विषयपत्रिका जारी न केल्याने विरोधकांनी सरकारवर टीका केली होती.
17 सप्टेंबर रोजी नव्या संसद इमारतीवर तिरंगा फडकवण्याचा सोहळा पार पडणार आहे. याच दिवशी या नव्या इमारतीत विश्वकर्मा पूजा देखील आहे. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. संसदेचं विशेष अधिवेशन (Parliament Special Session) 18 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यानंतर 19 सप्टेंबर पासून नव्या संसद भवनातून कामकाजास सुरुवात होणार आहे.
केंद्रीय लोक निर्माण विभागाने नवी इमारत बांधली आहे. नव्या संसदेत तीन प्रवेशद्वार आहेत . या तीन प्रवेशद्वारापैकी एक मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या गजद्वारासमोर ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. उद्घाटानंतर पार पडणारा हा पहिलाच सोहळा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 18 ते 22 सप्टेंबरला विशेष अधिवेशन संसदेच्या जुन्या इमारतीत सुरू होणार आहे. नव्या संसदेत उद्घाटनानंतर होणारा हा पहिला कार्यक्रम आहे. नव्या संसदेचे उद्घाटन 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते.