नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशानाच्या (Parliament Special Session) आधी केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 17 सप्टेंबर रोजी ही बैठक पार पडणार आहे. एएनआय वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. संसदेचं विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे. सर्वपक्षीय बैठकीत विशेष सत्राच्या अजेंड्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.


प्रल्हाद जोशी यांनी आज (13 सप्टेंबर) एक्सपर (पूर्वी ट्विटर) पोस्ट करुन लिहिलं आहे की, "या महिन्याच्या 18 तारखेपासून संसदेच्या विशेष सत्राच्या आधी  17  सप्टेंबरला संध्याकाळी साडेचार वाजता सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. यासाठी संबंधित नेत्यांना ई-मेलच्या माध्यमातून निमंत्रण पाठवण्यात आलं आहे." 






राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक


संसदच्या या विशेष अधिवेशनाबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विशेष अधिवेशनाच्या अजेंड्याबाबत चर्चा होऊ शकते. गृहमंत्री अमित शाह, अनुराग ठाकूर, अश्वनी वैष्णव यांच्यासह तमाम केंद्रीय मंत्री या बैठकीत सहभागी होऊ शकतात.


सूत्रांच्या माहितीनुसार, विशेष अधिवेशन संसदेच्या जुन्या इमारतीत सुरु होईल आणि 19 सप्टेंबर रोजी नव्या भवनात होईल. नव्या संसद भवनात आयोजित होणारं हे पहिलं अधिवेशन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 मे रोजी नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं होतं. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी विशेष अधिवेशनासाठीच्या अजेंड्याची माहिती नसल्याने सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.


अजेंड्याबाबत काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित


काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज (13 सप्टेंबर) एक्सवर पोस्ट करुन लिहिलं की, "आज 13 सप्टेंबर आहे. संसदेचं पाच दिवसीय विशेष अधिवेशन पाच दिवसांनी सुरु होणार आहे. एक व्यक्ती वगळता (कदाचित दुसराही) कोणालाही अजेंड्याबाबत माहित नाही. याआधी जेव्हा जेव्हा विशेष अधिवेशन किंवा विशेष बैठक आयोजित केल्या, तेव्हा अजेंडा आधीच माहित असायचा.


तृणमूलच्या खासदारांकडून ताशेरे


दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार डेरेक ओब्रायन यांनीही संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या अजेंड्याबाबत अद्याप एकाही शब्दाने भाष्य केलेलं नसल्याचं सांगून सरकारवर ताशेरे ओढले. त्यावर त्यांनी लिहिले. "संसदेचं विशेष अधिवेशन सुरु होण्यास कामकाजाचे दोन दिवस शिल्लक आहे आणि अजूनही अजेंड्याबाबत एक शब्दाने भाष्य केलेलं नाही. केवळ दोनच लोकांना याबाबत कल्पना आहे आणि तरीही आपण स्वतःला संसदीय लोकशाही म्हणवून घेतो.






हेही वाचा


PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी नव्या संसद इमारतीवर फडकणार तिरंगा, जोरदार तयारी सुरू