Parliament Security Breach : संसदेतील सुरक्षा भंग प्रकरणी लोकसभा सचिवालयाने कठोर कारवाई केली आहे. बुधवारी (13 डिसेंबर) झालेल्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी लोकसभा सचिवालयाने आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. या सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना निष्काळजीपणामुळे निलंबित करण्यात आल्याचे समजते. रामपाल, अरविंद, वीर दास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित आणि नरेंद्र अशी लोकसभा सचिवालयाने निलंबित केलेल्यांची नावे आहेत. संसदेत घुसखोरी करणाऱ्या पाच जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. घुसखोरीच्या घटनेत सहा आरोपींचा सहभाग होता, त्यापैकी एक अद्याप फरार आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या टीमला राजस्थानच्या नीमराना येथे त्याचे लोकेशन सापडले. त्यानंतर जेव्हा पोलिस त्याला पकडण्यासाठी पोहोचले तेव्हा तो तेथून फरार झाला. सध्या विशेष पथकाचे दोन पथक आरोपी ललित झाच्या शोधात आहेत. त्याला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
संसद घुसखोरी प्रकरणात सहापैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सहा जणांनी या घटनेचा कट रचल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. संसदेत घुसलेले हे सहा जण दीड वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते एकमेकांशी जोडले गेले. संसदेत येण्यापूर्वी त्यांनी रेकी केली होती.
संसद घुसखोरी प्रकरणात दुसऱ्या दिवशी काय घडलं?
- 4 जणांना UAPA अंतर्गत अटक. आज स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार
- संसदेभोवती सुरक्षा उपाय वाढवण्यात आले आहेत. आज कोणत्याही अभ्यागतांना आत जाण्याची परवानगी नाही
- सुरक्षा भंगावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चर्चेची मागणी केल्याने दोन्ही सभागृहात गोंधळ
- दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपापर्यंत तहकूब
- TMC खासदार डेरेक ओब्रायन संसदेतून निलंबित
- काँग्रेसचे सुद्धा पाच खासदार निलंबित
- काँग्रेसचे पाच लोकसभा खासदार, टीएन प्रतापन, हिबी इडन, एस जोथिमनी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोसे यांनाही लोकसभेतून उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे.
कोणाला अटक झाली?
संसदेतील घुसखोरी प्रकरणाती सागर शर्मा (26), मनोरंजन डी (34), अमोल शिंदे (25) आणि नीलम आझाद (42) अशी आरोपींची नावे असून पाचव्या व्यक्तीचे नाव विशाल शर्मा आहे. त्याला पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी UAPA अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्यांची चौकशी करण्यात येत आहे.
सुरक्षेतील त्रुटींच्या चौकशीसाठी समिती स्थापन
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, लोकसभा सचिवालयाच्या विनंतीवरून सुरक्षा त्रुटींची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) महासंचालक अनिश दयाल सिंह या समितीचे नेतृत्व करतील. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, समितीमध्ये इतर सुरक्षा एजन्सींचे सदस्य आणि तज्ज्ञांचाही समावेश करण्यात आला आहे. सुरक्षेतील त्रुटीचे कारण शोधून कारवाईची शिफारस करणे हे समितीचे काम आहे.
TMC खासदार डेरेक ओब्रायन राज्यसभेतून निलंबित
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार डेरेक ओब्रायन यांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजातून निलंबित करण्यात आले. ओब्रायन यांच्यावर सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणल्याने कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्यांना राज्यसभेतून अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आले. बुधवारी दुपारी लोकसभेतील सुरक्षेतील गोंधळानंतर आज गुरुवारी (14 डिसेंबर) संसद पुन्हा एकदा सुरू झाली. यादरम्यान ओब्रायन यांनी राज्यसभेच्या कामकाजात व्यत्यय आणण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले. दुसरीकडे, काँग्रेसचे पाच लोकसभा खासदार, टीएन प्रतापन, हिबी इडन, एस जोथिमनी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोसे यांनाही लोकसभेतून उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे.
संसदेत काय घडलं होतं?
आरोपींनी घुसखोरीचा कट केल्यानंतर सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी शून्य प्रहरात प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात उडी मारली आणि स्प्रे फवारून घोषणाबाजी केली. त्याचवेळी संसद भवनाबाहेर अमोल शिंदे आणि नीलम यांनीही स्प्रे फवारत घोषणाबाजी केली. ‘हुकूमशाही चालणार नाही’ अशा घोषणा दिल्या. सागर, मनोरंजन, अमोल आणि नीलम पोलिसांच्या ताब्यात आहेत. पाचवा आरोपी विशालला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संसदेत पोहोचण्यापूर्वी हे चौघेही विशालच्या घरी थांबले. सहावा आरोपी ललित हा फरार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या