No Confidence Motion Debate In Lok Sabha : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर (No Confidence Motion) चर्चा सुरु आहे. आज (9 ऑगस्ट) चर्चेचा दुसरा दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


विरोधकांची आघाडी INDIA ने केंद्र सरकारच्या आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मंगळवारी (8 ऑगस्ट) चर्चा सुरु झाली. त्याची सुरुवात काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी केली. पहिल्या दिवशी तब्बल 6 तास दोन्ही बाजूंच्या खासदारांनी सभागृहातील चर्चेत जोमाने भाग घेतला.


त्याचवेळी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, जे लोकसभेचं सदस्यत्व बहाल झाल्यानंतर सोमवारपासून (7 ऑगस्ट)  संसदेत परतले, ते मंगळवारी चर्चेत बोलले नाहीत, परंतु ते गुरुवारी (10 ऑगस्ट) चर्चेत सहभागी होण्याची शक्यता आहे.


अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान मोदी कधी उत्तर देणार?


मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मौन सोडण्यासाठी हा अविश्वास प्रस्ताव आणल्याचं काँग्रेससह विरोधी आघाडीतील पक्ष सांगत आहेत. 
20 जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत विरोधी पक्षांनी मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींच्या निवेदनाची मागणी लावून धरली आहे. अविश्वास प्रस्तावावरील चर्चा गुरुवारी 10 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ऑगस्टला अविश्वास प्रस्तावाला उत्तर देणार आहेत.


पहिल्या दिवशी अविश्वास ठरावावरील चर्चेत काय घडले?


अविश्वास ठरावावरील चर्चेच्या पहिल्या दिवशी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींच्या मौनावर निशाणा साधला. चर्चेची सुरुवात राहुल गांधी करतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु राहुल गांधी बोलले नाहीत, त्यावरुन भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी टोला लगावला. राहुल गांधी चर्चेला सुरुवात करतील असं आमच्या कानावर आलं होतं, परंतु कदाचित ते उशिरा उठले असतील, असं निशिकांत दुबे म्हणाले.


यावेळी सभागृहात सोनिया गांधीही हजर होत्या. भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, "मी सोनिया गांधींचा खूप आदर करतो. सोनिया गांधी भारतीय स्त्रीप्रमाणे वागत आहेत. त्याच्याकडे दोन कामं आहेत, एक म्हणजे मुलाला सेट करणं आणि दुसरं म्हणजे जावयाला भेट देणं." यावेळी त्यांनी नॅशनल हेराल्डचा मुद्दा देखील उपस्थित केला. त्यावर सोनिया गांधी यांनी हसतमुखाने उत्तर दिले. शिवसेनेचे (यूबीटी) खासदार अरविंद सावंत यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सभागृहातील वातावरण तापलं. मी त्यांची लायकी काढेन, असं नारायण राणे म्हणाले.


मणिपूरच्या मुद्द्यावरुन किरेन रिजिजू यांनी विरोधकांना घेरलं


मणिपूरच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, अविश्वास प्रस्ताव आणण्याचा टायमिंग आणि चुकीच्या पद्धतीने मांडल्याबद्दल विरोधकांना नंतर पश्चात्ताप होईल. मणिपूरमधील समुदायांमधील संघर्षाचा संदर्भ देताना त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर हल्लाबोल केला.


पृथ्वी विज्ञान मंत्री रिजिजू म्हणाले की, मणिपूरमध्ये संघर्षाची ठिणगी आज अचानक उद्भवलेली नाही, हे तुमच्या (काँग्रेस) गेल्या अनेक वर्षांच्या दुर्लक्षाचा परिणाम आहे. 2014 नंतर, पंतप्रधान मोदी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले तेव्हापासून संपूर्ण ईशान्येमध्ये एकही नवीन दहशतवादी गट तयार झालेला नाही, असंही किरेन रिजिजू म्हणाले.


त्यानंतर केंद्र सरकारवर निशाणा साधत काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी म्हणाले की, ईशान्येतील कोणत्याही राज्यात जेव्हा जेव्हा सामाजिक उलथापालथ होते तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण ईशान्येवर होतो.


हेही वाचा


No Confidence Motion : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरून संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा; आतापर्यंत काय घडलं?