9th August Headline : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत मांडण्यात आलेल्या अविश्वाच्या प्रस्तावावर आज पुन्हा चर्चा होणार आहे. या मुद्द्यावरुन संसदेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. तर खासदारकी मिळाल्यानंतर राहुल गांधी हे राजस्थानमध्ये त्यांची पहिली जाहीर सभा घेणार आहेत. सांगलीत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये बीआरएस पक्षाचा शेतकरी मेळावा संपन्न होणार आहे. तर अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. 


लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार


मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधककांडून केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. यावरुन मंगळवारी संसदेत गदारोळ झाला. आजही लोकसभेत चर्चा होणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, स्मृती इराणी तसेच निर्मला सीतारामन लोकसभेत सरकारच्यावतीने भाषण करतील. तर, विरोधकांकडून राहुल गांधी बोलण्याची शक्यता आहे.


राहुल गांधींची सभा


राहुल गांधी हे राजस्थानमधील मानगडच्या दौऱ्यावर असणार आहेत. तसेच आदिवासी दिनी काँग्रेसकडून निवडणुकांचं बिगुल देखील वाजणार आहे.  यावेळी राहुल गांधी हे सभेला संबोधित करणार असून खासदारकी मिळल्यानंतरची राहुल गांधी यांची ही पहिली जाहीर सभा असणार आहे. 


ज्ञानव्यापी सर्वेक्षणाला सुरुवात


ज्ञानवापीवरील सर्वेक्षण आज सकाळपासून सुरुवात होणार आहे. एएसआयच्या पथकाने मंगळवारी शृंगार गौरी गेट येथे सर्वेक्षण केले असून आज पुन्हा एएसआयच्या पथकाकडून हे सर्वेक्षण होणार आहे. 


सांगलीत बीआरएस पक्षाचा मेळावा 


तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत राष्ट्र समितीचा शेतकरी आणि सन्मान मेळावा सांगलीत पार पडणार आहे. या सोहळ्याचे आयोजन शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांच्यावतीने करण्यात आले आहे. 


विरोधी पक्षनेते पद स्विकारल्यानंतर वडेट्टीवार मतदारसंघात


विजय वडेट्टीवार यांनी  पक्षनेते पद स्वकारल्यानंतर पहिल्यांदा नागपुरात दाखल होणार आहेत.  यावेळी काँग्रेसचे कार्यकर्त्यांकडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. 


अमरावतीत बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली आंदोलन


बच्चू कडू शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज "जन एल्गार मोर्चा" काढणार आहेत. संत गाडगेबाबा समाधी मंदिर ते विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा निघणार आहे.


मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी 


कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांनी दाखल केलेल्या  दोषमुक्तीच्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. 
 
मुंबईसह आसपासच्या परिसरातील रस्त्यांवरचे खड्डे  यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे.