Parliament Monsoon Session 2023: दिल्लीत (Delhi) पार पडलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये मणिपूर हिंसाचार, महागाई, दिल्ली अध्यादेश, समान नागरी कायदा, महिला आरक्षण यांसरख्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. आज (20 जुलै) रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सुरुवात होणार आहे. त्याचपार्श्वभूमीवर दिल्लीत बुधवारी (19 जुलै) रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली आहे.
या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वाणिज्यमंत्री पियुष गोयल, संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशिवाय काँग्रेसचे खासदार जयराम रमेश, अधीर रंजन चौधरी हे देखील उपस्थित होते. या बैठकीसाठी आपचे नेते संजय सिंह, शिरोमणी अकाली दलचे हरसिमत कौर बादल यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली.
या बैठकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी देशांतील अनेक मुद्दे उपस्थित केले. काँग्रेसने या बैठकीमध्ये मणिपूर हिंसाचार आणि तेथील सद्यस्थिती शिवाय ओडिशामधील रेल्वे अपघात आणि महागाईसारख्या मुंद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसने काय मागणी केली?
जर सरकारला अधिवेशन चालवायचे असेल तर त्यांनी विरोधी पक्षांना देखील आपलं म्हणणं मांडण्याची संधी द्यायला हवी. पीटीयाने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनमध्ये सहभागी होण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. तसेच या अधिवेशनात मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केल्याचं काँग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी यांनी सांगितलं आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, सरकारने आता आमच्या मनातल्या गोष्टी ऐकायला हव्यात.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या बैठकीमध्ये सहभाग घेतला. या बैठकीमध्ये त्यांनी समान नागरी कायद्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
सरकारने काय म्हटलं?
सरकारने या सर्व मुद्द्यांवर पावसाळी अधिवेशात चर्चा करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. तसेच मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली असून या मुद्द्यावर देखील संसदेत चर्चा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन हे 20 जुलै ते 11 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. तसेच या अधिवेशनामध्ये एकूण 17 बैठकांचं आयोजन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.