Parliament Monsoon Session 2023 : सोमवार (24 जुलै) रोजी संसदेच्या (Parliament) पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर संसदेत विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ मणिपूरच्या दौऱ्याला पाठवण्याच्या विषयावर चर्चा होऊ शकते. तर दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांकडून पंतप्रधानांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्याची मागणी जोर धरु शकते.
सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आंदोलन करणार
संसदेच्या परिसरात भाजप खासदारांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. तर विरोधी पक्षांकडून संसदेतील गांधींच्या प्रतिमेजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच विरोधी पक्षांकडून बैठक घेऊन पुढील रणनितीवर चर्चा करण्यात येणार आहे. तर विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ मणिपूर कधी पाठवयाचे त्याची तारीख ही निश्चित होऊ शकते.
भाजप विरोधी पक्षांना घेरण्याच्या तयारीत
राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्ररकणी तसेच इतर राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराप्रकरणी सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांना घेरण्याच्या तयारीत आहेत. मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी संसदेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यांनंतर संसदेचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत विरोधी पक्ष मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी जरी तयार झाले असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावर सविस्तर स्पष्टीकरण देण्याची मागणी विरोधक करत आहेत.
भाजपचा मुद्दा काय?
पश्चिम बंगालमध्ये दोन आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याच मुद्द्यावर भाजप विरोधकांना कोंडीत पकडण्याची योजना आखणार आहे. याशिवाय बिहार, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये महिला आणि दलितांवरील अत्याचाराचा मुद्दा भाजप उचलणार आहे. त्यामुळे सोमवारी संसदेत मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.
भाजपने शुक्रवारी (२१ जुलै) रोजी तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. तर गुरुवार (20 जुलै) रोजी अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधक मणिपूरच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी पक्षाला अनेक सवाल करत आहेत. यापूर्वी संसदेत विरोधी पक्षांकडून मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यामुळे सोमवारी संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून करण्यात येणारे आंदोलन हे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान संसदेत आणखी कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.