Sansad Canteen Food News : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. या काळात संसदेत येणाऱ्या खासदारांसह, पत्रकार आणि प्रेक्षकांची संख्याही वाढलेली असते. दरम्यान, संसदेचे कॅन्टीन (Sansad Canteen) कसे असते याबबत तुम्हाला माहीती आहे का? व्हेज थाळी किती रुपयांना मिळते आणि चपातीची किंमत किती आहे? 50 च्या दशकात संसदेचे कॅन्टीन सुरू झाले होते, त्यावेळी फक्त 50 पैशामध्ये जेवणाची थाळी मिळत होती. मात्र, त्यानंतरच्या 70 वर्षामध्ये भारतीय संसदेचे कॅन्टीन पूर्णपणे बदललं आहे.


अलीकडे संसदेचे कॅन्टीन अधिक आधुनिक आणि सुसज्ज करण्यात आलं आहे. बाजरीच्या पदार्थांची यादी देखील मेनूमध्ये खास समाविष्ट केली गेली आहे. मात्र, सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी संसदेच्या कॅन्टीनचे अनुदान रद्द करण्यात आले आहे. याआधी ते स्वस्त खाद्यपदार्थांमुळे चर्चेत होते. आता तिथे सर्व खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्या आहेत, पण तरीही बाहेरच्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या तुलनेत ते स्वस्त मानले जातील. संसद भवन संकुलातील कॅन्टीनचे व्यवस्थापन पूर्वी उत्तर रेल्वेकडे होते. आता हे कॅन्टीन जानेवारी 2021 पासून भारत पर्यटन विकास महामंडळ (ITDC) चालवत आहे.


संसदेतील जेवणाच्या पदार्थांची किंमत किती?


संसदेच्या कॅन्टीनमधील जेवणाच्या पदार्थांच्या किंमती बदलल्या आहेत. संसदेच्या कॅन्टीनमध्ये एका चपातीची किंमत 3 रुपये आहे. चिकन बिर्याणी आणि चिकन करी ची किंमत 100 रुपये आहे. 75 रुपये आहे. सँडविचसारख्या वस्तूंची किंमत 3 रुपये ते 6 रुपयापर्यंत आहे. तर शाकाहारी थाळीची किंमत 100 रुपये आहे


 संसदेच्या कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांच्या किमतींवर मोठ्या प्रमाणात अनुदान


देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा संसदेचे कॅन्टीन अतिशय छोटे होते. गॅस शेगडीही नंतर आली. यापूर्वी कॅन्टीन चालवण्यासाठी लोकसभेच्या कर्मचाऱ्यांनाच नियुक्त केले जात होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु अनेकदा या कॅन्टीनमध्ये जेवायला यायचे. मात्र, नंतरच्या काळात कॅन्टीनची व्यवस्था हळूहळू बदलत गेली. 1950 आणि 1960 च्या दशकात संसदेच्या कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांच्या किमतींवर मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात आले होते. त्यावेळी साध्या शाकाहारी थाळीची किंमत फक्त 50 पैसे होती, ज्यामध्ये कोणीही मनसोक्त खाऊ शकत होता. याशिवाय चहा, नाश्ता आणि इतर खाद्यपदार्थांचे दरही खूपच कमी होते. खासदार आणि कर्मचाऱ्यांना स्वस्त दरात अन्न उपलब्ध होते. 1970 आणि 1980 च्या दशकात संसदेच्या कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांच्या किमती कमीच होत्या. त्यावेळी शाकाहारी थाळी फक्त 30 रुपयांना आणि चिकन करी 50 रुपयांना मिळत होती. रोटी दोन रुपयांना होती. 90 च्या दशकातही या किमती कायम होत्या.


60 च्या दशकात संसदेच्या कॅन्टीनमध्ये आमूलाग्र बदल झाला. एलपीजीचा इंधन म्हणून वापर सुरू झाला. कॅन्टीन अधिक व्यावसायिक आणि उत्तम बनवण्यासाठी लोकसभा सचिवालयानेच कॅन्टीन चालवण्याची व्यवस्था संपवून कॅन्टीन चालवण्याची जबाबदारी भारतीय रेल्वेकडे सोपवली होती. 1968 पासून भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागातील IRCTC ने कॅन्टीनचे काम हाती घेतले. हा तो काळ होता जेव्हा कॅन्टीन खूप स्वस्त होती आणि शाकाहारी ते मांसाहारीपर्यंत विविध खाद्यपदार्थ उपलब्ध होते.


संसदेत जेवणाची व्यवस्था कशी?


संसदेत मुख्य स्वयंपाकघर आहे. येथे जेवण तयार करून संसदेच्या संकुलात उभारलेल्या पाच कॅन्टीनमध्ये नेले जाते. जिथे अन्न गरम करण्याची पूर्ण व्यवस्था आहे. संसदेच्या कॅन्टीनमध्ये जेवणाची प्रक्रिया सकाळपासूनच सुरू होते. सकाळी कॅन्टीनमध्ये पुरेशा प्रमाणात भाज्या, दूध, मांस आणि इतर जीवनावश्यक वस्तू पोहोचतात. कॅन्टीन कर्मचारी आपले काम सुरू करतात. कॅन्टीनमध्ये कॉम्प्युटर प्रिंटरपासून ते फर्निचर आणि स्टोव्हपर्यंत सर्व काही लोकसभेच्या सचिवालयाकडून पुरवले जाते.


संसदेचे अधिवेशन सुरू असताना कॅन्टीनमध्ये सुमारे 5000 लोकांसाठी जेवण 


सन 2008 च्या सुमारास, पाइपलाइन आणि उपकरणातील खराबीमुळे गॅस गळतीमुळे, कॅन्टीनमधील संपूर्ण इंधन प्रणाली बदलली गेली. आता इथले अन्न पूर्णपणे विद्युत उपकरणांवर शिजवून तयार केले जाते. कॅन्टीनची व्यवस्था आणि दर्जा पाहण्याचे काम खासदारांशी संबंधित समिती करते. त्यासाठी ती वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वेही ठरवते. जोपर्यंत आयआरसीटीसी संसदेचे कॅन्टीन चालवत होते, तोपर्यंत त्यांच्याकडे सुमारे 400 कर्मचारी असायचे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना कॅन्टीनमध्ये सुमारे 5000 लोकांसाठी जेवण बनवले जाते. साधारणपणे 11 वाजेपर्यंत जेवण तयार होते. त्यानंतर मुख्य कॅन्टीनमधून संकुलातील दुसऱ्या कॅन्टीनमध्ये नेले जाते. 


सध्या संसदेचं कॅन्टीन भारतीय पर्यटन विकास महामंडळ 


गतवर्षीपर्यंत कॅन्टीनमध्ये एकूण 19 प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध होते. ज्यामध्ये नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता असतो. पण आता हे कॅन्टीन भारतीय पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच ITDC द्वारे 27 जानेवारीपासून चालवले जात आहे. आता खाद्यपदार्थांची संख्या 48 झाली आहे. हे सर्व पदार्थ उत्तम दर्जाचे आणि चवीचे असतात. कॅन्टीनमधील अन्नधान्य, डाळी, तेल, तूप, मसाले इत्यादी अत्यावश्यक खाद्यपदार्थ सेंट्रल स्टोअरमधून खरेदी केले जातात, तर दैनंदिन भाज्या आणि फळे संसद परिसराजवळ असलेल्या मदर डेअरीमधून येतात. दिल्ली दूध योजनेतून दररोज तेथे दूध येते. संसदेच्या गेटवर बाहेरून येणाऱ्या खाद्यपदार्थांची कडक तपासणी केली जाते. त्याला एक्स-रे मशिनमधून जावे लागते. यापूर्वी कॅन्टीनमध्ये दिल्या जाणाऱ्या मिठाई बाहेरून टेंडरद्वारे आणल्या जात होत्या.


अधिवेशनाच्या काळात संसदेच्या कॅन्टीनमध्ये खूप गर्दी 


अधिवेशनाच्या काळात संसदेच्या कॅन्टीनमध्ये खूप गर्दी असते आणि लांबच लांब रांगा लागतात, पण सामान्य दिवशी इथली गर्दी कमी होते. साधारणपणे आता सरकारचे मंत्रीही कॅन्टीनमध्ये क्वचितच दिसतात. जुन्या खासदारांचे म्हणणे आहे की, 80 च्या दशकापर्यंत केवळ मंत्रीच नाही तर पंतप्रधानही अनेकदा येथील कॅन्टीनमध्ये दिसत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीही 2014 साली कॅन्टीनमध्ये जेवण करायला गेले होते. त्यापूर्वी ते इथे यायचे, असेच पंडीत जवाहरलाल नेहरुंबद्दल सांगितले जाते. इंदिरा गांधी पंतप्रधान नसताना इथे दिसायच्या, तर पीव्ही नरसिंह राव पंतप्रधान होण्याआधी ते खासदार आणि मंत्री होईपर्यंत इथे नियमित दिसायचे.