Akhilesh And Dimple Yadav Love Story : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव उत्तर प्रदेश राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. 15 मार्च 2012 रोजी अखिलेश अवघ्या 38 वर्षांचे असताना त्यांची यूपीचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. 2012 ते 2017 पर्यंत त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. 19 मार्च 2017 रोजी अखिलेश यांच्यानंतर योगी आदित्यनाथ यूपीचे मुख्यमंत्री झाले. अखिलेश यादव यांना राजकीय वारसा आहे. दिवंगत वडील मुलायम सिंह यादव हे समाजवादी पक्षाचे संस्थापक आहेत. अखिलेश यांचा विवाह डिंपल यादव यांच्याशी झाला असून त्या सुद्धा राजकारणात आहेत. मुख्यमंत्री असताना, अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातील विविध विकास प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले, ज्यात आरोग्य सेवा सुधारणा, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी पुढाकार घेतला. 


2024 लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातील 80 लोकसभा जागांपैकी 37 जागा जिंकल्या, तर भारतीय जनता पक्षाला केवळ 33 जागा मिळाल्या. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना 6,42,292 मते मिळाली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सुब्रत पाठक यांचा 1 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. 


अखिलेश यादव  यांचा परिचय 


अखिलेश यादव यांचा जन्म 1 जुलै 1973 रोजीचा आहे. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील सैफई येथे मुलायम सिंह यादव आणि त्यांची पहिली पत्नी मालती देवी यांच्या पोटी झाला. त्यांची आई आयुष्यभर आजारी राहिली आणि मुलायमसिंह यादव त्यांच्या राजकीय कारकिर्दीत व्यस्त राहिले. त्यामुळे अखिलेश यांचे संगोपन त्यांच्या आजी-आजोबांनी केले. अखिलेश यांनी राजस्थानमधील धोलपूर मिलिटरी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते म्हैसूर विद्यापीठात सिव्हिल एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंगमध्ये पदवी मिळवण्यासाठी गेले. पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी अखिलेश यादव परदेशात गेले. सिव्हिल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण करण्यासाठी त्यांनी सिडनी विद्यापीठात प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भारतात परतले आणि 2000 मध्ये राजकीय कारकीर्द सुरू केली. उत्तर प्रदेशातील कन्नौजमधून झालेल्या पोटनिवडणुकीत ते 13व्या लोकसभेवर निवडून आले. अखिलेश यादव यांनी 24 नोव्हेंबर 1999 रोजी डिंपल रावत यांच्याशी विवाह केला. 


अखिलेश यादव आणि डिंपल यांची भेट 


अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव या देशातील प्रमुख महिला राजकारण्यांपैकी एक आहेत. डिंपल यादव यांचा जन्म 15 जानेवारी 1978 रोजी झाला. त्यांचे वडील रामचंद्र सिंह रावत हे भारतीय लष्कराचे निवृत्त कर्नल आहेत आणि त्यांची आई चंपा रावत आहे. त्या मूळच्या उत्तराखंडमधील आहेत.  त्यांनी आर्मी पब्लिक स्कूल, लखनौ येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि लखनौ विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली. 2009 मध्ये, डिंपल यादव यांनी समाजवादी पक्षाचे प्रतिनिधित्व करत उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद मतदारसंघातून लोकसभा पोटनिवडणूक लढवली. 2012 मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशातील कन्नौज मतदारसंघातून पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवली तेव्हा त्या जिंकल्या आणि खासदार झाल्या.


अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांची प्रेमकहाणी


भारतातील राजकीय नेत्यांच्या लव्हस्टोरीपैकी एक असलेल्या अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांची स्टोरीही (Akhilesh And Dimple Yadav Love Story) लोकप्रिय आहे. त्यांची पहिली भेट एका मित्राच्या माध्यमातून झाली. जेव्हा ते एकमेकांना पहिल्यांदा भेटले तेव्हा अखिलेश 21 वर्षांचे होते, तर डिंपल फक्त 17 वर्षांची होती. त्यानंतर ते मित्र झाले आणि अनेकदा भेटू लागले. त्यावेळी डिंपल लखनौ विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण करत होती. बरेच दिवस मित्र राहिल्यानंतर अखिलेश यादव आणि डिंपल रावत एकमेकांना डेट करू लागले. हे जोडपे चार वर्षे डेट करत होते. उरलेले आयुष्य एकमेकांसोबत घालवायचे ठरवल्यावर त्यांनी आपापल्या नात्याची माहिती आपापल्या घरच्यांना दिली.


अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांचा आंतरजातीय विवाह


अखिलेश आणि डिंपल वेगवेगळ्या जातीचे असल्याने दोघांचेही कुटुंब त्यांच्या लग्नाच्या निर्णयाच्या विरोधात होते. तथापि, अखिलेश यांच्या आजी मूर्ती देवी यांनी त्यांचे वडील मुलायम सिंह यादव यांना त्यांच्या आंतरजातीय विवाहासाठी राजी केले होते. दोन्ही कुटुंबीयांनी सहमती दर्शवल्यावर अखिलेश आणि डिंपलचे 24 नोव्हेंबर 1999 रोजी लग्न झाले. या दाम्पत्याला आदिती यादव, अर्जुन यादव आणि टीना यादव अशी तीन मुले आहेत. सध्या अखिलेश यादव आणि डिंपल यादव हे राजकीय दाम्पत्य समाजवादी पक्षाला नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या